सांकवाळसह संपूर्ण गोव्यात पुन्हा खळबळ
वास्को : सांकवाळ झुआरीनगर येथील बिट्स पिलानीच्या गोवा कॅम्पसला आणखी एका विद्यार्थ्याने हादरा दिला. द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या ऋषी नायर या 20 वर्षीय विद्यार्थ्याचा गुरुवारी हॉस्टेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्याने आत्महत्या केली असण्याचा संशय आहे. बिट्स पिलानीच्या गोवा कॅम्पसमध्ये मागच्या दहा महिन्यांमध्ये झालेला हा पाचवा मृत्यू असून मागच्याच महिन्यात कुशाग्र जैन या विद्यार्थ्याचा असाच संशयास्पद मृत्यू झाला होता. या घटनेने बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये चिंता पसरली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आले. मयत विद्यार्थ्याच्या वडिलांनी सकाळी दहाच्या सुमारास त्याला फोन केला होता. मात्र, तो फोन उचलत नसल्याने वडिलांनी बिट्स पिलानी कॅम्पसला याबाबत माहिती दिली. त्यामुळे कॅम्पसच्या कर्मचाऱ्यांनी तो विद्यार्थी राहात असलेल्या हॉस्टेलमधील खोलीकडे जाऊन पाहणी केली असता, दरवाजा आतून बंद होता. मात्र, तो आतून कसलाच प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दरवाजाच्या वरच्या भागातून पाहिले असता तो आपल्या बिछान्यावर झोपलेला असल्याचे आढळून आले. त्यामुळे दरवाजा उघडण्यात आला व त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो मृतावस्थेत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी पंचनाम्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला. मयत विद्यार्थ्याने उलटी केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली असण्याचा संशय बळावला आहे. यासंबंधी वेर्णा पोलिस अधिक तपास करीत आहेत. शवविच्छेदनानंतरच या मृत्यूबाबत निश्चित माहिती उघड होणार आहे. मात्र, कुशाग्र जैन आणि ऋषी नायर या दोघानांही जवळपास एकाच पद्धतीने मृत्यू आलेला आहे. मयत विद्यार्थी ऋषी नायर हा बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये एमएससी फिजिक्स विषयात दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता.
या शिक्षण संस्थेचे शैक्षणिक वर्ष मागच्या महिन्यापासूनच सुरू झाले. त्यामुळे ऋषी मागच्या महिन्यातच या संस्थेत रूजू झाला होता. पहिल्या वर्षाचे शिक्षण या विद्यार्थ्याने हैद्राबादमध्ये घेतले होते. त्यामुळे तो संस्थेत नवीन होता. मिळालेल्या माहितीनुसार त्याचे कुटुंबच हैद्राबादहून गोव्यात आलेले असून त्याचे कुटुंबीय सांकवाळ भागातच राहतात. कुटुंबीय लगेच उपलब्ध झाल्याने पोलिसांनी त्याच्या आईवडिलांकडून चौकशीला प्रारंभ केला.
नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय
खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 20 वर्षीय ऋषी नायर हा विद्यार्थी साधारण वर्षभरापासून नैराश्यात होता. तो नैराश्यातून बाहेर पडावा यासाठी त्याच्या आईवडिलांनी गोव्यात स्थलांतर केले होते. त्याला नव्या वातावरणात आणले होते. नैराश्यावर तो उपचारही घेत होता. मात्र, तो त्या मनोवस्थेतून बाहेर पडू शकला नाही. हॉस्टेलमधील एकटेपणामुळे त्याने मृत्यूला कवटाळणे सहज शक्य झाले अशी चर्चा आहे.
दहा महिन्यांतील पाचवा मृत्यू
ऋषी नायर या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे बिट्स पिलानी गोवा कॅम्पसला आणखी एक हादरा बसला आहे. मागच्या दहा महिन्यांतील हा पाचवा मृत्यू आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये ओम प्रियान सिंग, त्यानंतर मार्चमध्ये अथर्व देसाई, त्यानंतर मे महिन्यात कृष्णा कासेरा व ऑगस्टमध्ये कुशाग्र जैन अशा पाच विद्यार्थ्यांचा संस्थेच्या हॉस्टेलमध्ये संशयास्पद मृत्यू झालेला आहे. पहिल्या तिघा विद्यार्थ्यांनी थेट गळफास लावून आत्महत्या केली होती. शेवटच्या दोघांनी औषधांचे अति डोस घेऊन किंवा विष पिऊन आत्महत्या केली असण्याचा संशय आहे. आपले जीवन संपवलेले सर्व विद्यार्थी दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील शिक्षण घेणारे आहेत.
बिट्स संस्थेच्या उपाययोजना निष्फळ
बिट्स पिलानी या संस्थेत देशभरातील बुद्धिमान विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मात्र, हे विद्यार्थी मानसिक तणाव दूर करण्यास कमी पडत असावेत असा संशय आहे. विद्यार्थ्यांच्या सततच्या मृत्यूमुळे संस्थेचीही बदनामी होत आहे. पहिल्या तीन आत्महत्या उघडकीस आल्यानंतर बिट्स पिलानी गोवा कॅम्पसने तातडीने काही उपाययोजना हाती घेतल्या होत्या. विद्यार्थी तणावापासून दूर राहावेत तसेच त्यांच्यात मानसिक संतुलन असावे याकरीता संस्थेने विद्यार्थ्यांसाठी खास समुपदेशक उपलब्ध केलेले आहेत. मात्र, संस्थेचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. सतत तीन आत्महत्या उघडकीस आल्यानंतर गोव्याचे तत्कालीन राज्यपाल ई श्रीधरन पिल्ले यांनी बिट्स पिलानी संस्थेने सविस्तर चौकशी अहवाल सादर करण्याचे आवाहन केले होते. संस्थेने यासंबंधीचा अहवाल राज्यपालांना सादर केला होता.
सखोल चौकशीची काँग्रेसची पुन्हा मागणी
काँग्रेसने बिट्स पिलानीतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूंची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. मागच्या महिन्यांत झालेल्या मृत्यूनंतर काँग्रेसचे कुठ्ठाळीतील नेते ओलान्सीयो सिमोईस यांनी विशेष चौकशी पथकाद्वारे या मृत्यूंची चौकशी सरकारने करावी अशी मागणी केली होती. तसेच काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वेर्णा पोलीस व बिट्स पिलानी गोवा कॅम्पसच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा केली होती. त्यांनी पुन्हा सखोल चौकशीची मागणी केली आहे.
शिक्षणाबरोबरच मुलांचा भावनिकदृष्ट्या विकास होणे गरजेचे
मानसिक तणावातून जर विद्यार्थी आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलत असतील तर तो गंभीर चिंतेचा विषय आहे. अशी मानसिकता रोखण्यासाठी मुलांचा किंवा विद्यार्थ्यांचा भावनिकदृष्ट्या विकास होणे आवश्यक आहे. आपल्या समाजातील कुमारवयीन मुले शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी जसा आपण प्रयत्न करतो तसेच ते भावनिकदृष्ट्याही बुद्धिमान व्हावेत यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहेत. त्यासाठी ठोस पातळीवर नकार पचवण्याचे कौशल्य, सबुरी बाळगण्याचे कौशल्य, समस्या निवारण्याचे कौशल्य व निर्णय घेण्याचे कौशल्य, ही चार कौशल्ये शालेय जीवनापासून मुलांना शिकवण्याची गरज आहे. तरच भावनिकदृष्ट्या विकसीत पिढी घडेल.
– डॉ रूपेश पाटकर (प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ)









