अथणी पोलिसांची यशस्वी कारवाई : 2 पिस्तूल, 7 काडतुसे जप्त : तिघे अद्याप फरार
बेळगाव : अथणी येथील एका सराफी दुकानात पिस्तुलीचा धाक दाखवून दागिने लुटण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील दोघा जणांना अटक करून त्यांच्याजवळून दोन पिस्तूल, सात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या टोळीतील आणखी तिघे जण फरारी आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली. 26 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास अथणी येथील त्रिमूर्ती ज्वेलर्स या सराफी दुकानाच्या मालकाला पिस्तुलीचा धाक दाखवून दागिने लुटण्याचा प्रयत्न झाला होता. त्याच दिवशी यासंबंधी अथणी पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी विजय संजय जावीर (वय 33) राहणार करंडेमाळ, शहापूर, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, यशवंत ऊर्फ ओंकार गोपीनाथ गुरव (वय 24) राहणार जरंडी, ता. तासगाव, जि. सांगली या दोघा जणांना अटक केली आहे.
त्यांच्याजवळून दोन पिस्तूल, सात जिवंत काडतुसे, गुन्ह्यासाठी वापरलेली महिंद्रा एक्सयुव्ही-500 कार, एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. सराफी दुकानाच्या मालकाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला ढकलून या टोळीतील गुन्हेगारांनी पलायन केले होते. यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल झाले होते. फुटेज वगळता इतर कसलाही सुगावा उपलब्ध नव्हता. तरीही अथणी पोलिसांनी या टोळीतील दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विजय हा बांधकाम व्यावसायिक आहे. यशवंत हा शेती करतो. हणमांत वांडरे (वय 28) राहणार सावळज, ता. तासगाव, जि. सांगली, सूरज नानासो बुधावले (वय 25) राहणार पुसेगाव, विसापूर, ता. खटाव, जि. सातारा, सध्या राहणार इचलकरंजी, भरत चंद्रकांत काटकर (वय 29) राहणार आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली हे तिघे जण फरारी असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले. अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुनोळ्ळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर, उपनिरीक्षक जी. एस. उप्पार, उपनिरीक्षक मल्लिकार्जुन तळवार, ऐगळीचे उपनिरीक्षक कुमार हाडकर आदींचा समावेश असलेल्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला आहे.









