ग्रामस्थांमध्ये घबराट : पोलिसांकडून तपास
वृत्तसंस्था/अयोध्या
उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील मिल्कीपूर परिसरात बुधवारी रात्री अनेक ठिकाणी लोकांना ड्रोन दिसले. ड्रोन पाहिल्यानंतर गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. गावकरी रात्री उशिरापर्यंत घाबरून जागे राहिले. तसेच पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला. परंतु, ड्रोनबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. रेवना, इनायत नगरमधील मिल्कीपूर बाजारपेठ, खंडासा-काळुवामाऊ, कोटीया, घाटौली, नागीपूर, जयराजपूर, मिचकुढी, जगन्नाथपूर आणि टिंडौली या गावांमध्ये आकाशात ड्रोनसारख्या चमकदार वस्तू फिरताना दिसल्याचे सांगण्यात आले. गावकऱ्यांनी त्याचे फोटो काढले आणि व्हिडिओही बनवले. ड्रोन पाहून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. बराच वेळ आकाशात फिरत राहिलेल्या या ड्रोनबद्दल विविध चर्चा आणि अफवा पसरू लागल्या. काहींनी याला सर्वेक्षणाशी जोडले, तर काहींनी याला संशयास्पद कृती मानून भीती व्यक्त केली. याबाबत सखोल तपास सुरू असून प्रशासन किंवा पोलिसांकडून अधिकृत कोणतीही माहिती जारी करण्यात आलेली नाही.









