भारतीय फुटबॉल संघाची स्थिती अलीकडच्या काळात सुधारता सुधरेना अशी झालेली असून अनेक प्रशिक्षकांना पडताळून पाहिलं, तरी त्यात फरक दिसलेला नाही…अगदी आंतरराष्ट्रीय नावांना करारबद्ध करायचं आणि नंतर हवा तसा निकाल मिळेनासा झाल्यावर त्यांना हाकलून लावायचं किंवा त्यांनी स्वत:च निरोप घ्यायचा असं चित्र कित्येकदा पाहायला मिळालंय…या पार्श्वभूमीवर बऱ्याच वर्षांनी ‘एआयएफएफ’नं पसंती दिलीय ती एका प्रभावी कामगिरी खात्यात असलेल्या स्वदेशी प्रशिक्षकाला…भारतीय फुटबॉलचं भविष्य त्यांना तरी पालटविता येईल का ?…
‘ते’ बनलेत गेल्या दोन दशकांतील भारतीय फुटबॉल संघाचे पहिलावहिले स्वदेशी प्रशिक्षक…त्यापूर्वी सुखविंदर सिंग यांना 2005 साली प्रशिक्षकपद सोडावं लागलं होतं. पंजाबमधील ‘जेसीटी’च्या त्या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूनं 2001 मध्ये कारकिर्दीतील पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात विजयाची नोंद केली होती…‘त्यांनी’ देखील आता अगदी तशाच कामगिरीचं दर्शन घडविलंय अन् भारतानं तब्बल 17 वर्षांच्या कालावधीनंतर ताजिकिस्तानचा पराभव केलाय…
‘त्यांच्या’ मार्गदर्शनाखाली नवोदित आयझोल एफसीनं ‘आय-लीग’चं ऐतिहासिक जेतेपद मिळविलं ते मोहन बगानला दुसऱ्या क्रमांकावर ढकलून. त्यामुळं साऱ्यांनाच आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला…‘त्यांना’ ‘इंडियन सुपर लीग’मधील संघांना सुद्धा प्रशिक्षण देण्याची संधी मिळालीय…‘त्यांनी’ कारकिर्दीची सुरुवात केली ती मधल्या फळीतील खेळाडू या नात्यानं ‘एअर इंडिया’ संघाचं प्रतिनिधीत्व करून…‘आय लीग’मधील सर्वांत लहान वयाचे प्रशिक्षक ठरलेले खालिद जमील…
अखिल भारतीय फुटबॉल महासंघानं (एआयएफएफ) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय, ‘आता वेळ आलीय ती भारतीय प्रशिक्षकाला नेमण्याची. खालिद यांची खेळण्याची पद्धत अतिशय सोपी असल्यानं ती खेळाडूंना आत्मसात करणं कठीण जाणार नाहीये’…त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायला हवं की, ‘एआयएफएफ’ला मार्केटिंग भागीदाराकडून दरवर्षी मिळणारा 50 कोटी रुपयांचा झरा आटल्यानं सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनलीय. या पार्श्वभूमीवर एखाद्या भारतीय प्रशिक्षकाची निवड केल्याशिवाय पर्यायच नव्हता…असं असलं, तरी जमील यंची निवड ही सार्थच म्हणायला हवी…
त्यांचे सुरुवातीचे प्रशिक्षक बिमल घोष सांगतात, ‘खालिद मैदानावर सर्वांत लवकर यायचा. प्रचंड मेहनत करायचा आणि सर्वांत शेवटी घरी परतायचा. एखाद्या झपाटलेल्या व्यक्तीप्रमाणं तो सराव करत असे. मी माझ्या कारकिर्दीत तशा पद्धतीनं सराव करताना कुणालाही पाहिलेलं नाहीये. त्याला फुटबॉलचं प्रचंड वेड लागलं होतं असंच म्हणावं लागेल’…खालिद जमील भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक बनलेत ते त्याच्या जोरावरच. विशेष म्हणजे त्यांनी प्रमुख प्रशिक्षकपद मिळविलंय ते केलेल्या कष्टांच्या आधारे. त्यांचा जन्म झाला तो कुवेतमध्ये. एक उत्कृष्ट ‘सेंट्रल मिडफिल्डर’ म्हणून नाव कमावलेल्या जमीलनी प्रतिनिधीत्व केलंय ते ‘एअर इंडिया’ व ‘महिंद्रा युनायटेड’चं. ते नेहमीच ‘नो नॉन्सेन्स’ पद्धतीनं खेळलेत, संघांचं नेतृत्व केलंय आणि सातत्याचं सुरेख दर्शन घडविलंय…
खालिद जमीलचे सहकारी आणि ‘एअर इंडिया’चे माजी खेळाडू गॉडफ्रे पेरेरा (दोघांनीही ‘एएफसी’ ‘ए-लायसेन्स’ प्रशिक्षक बनण्याचा मान मिळविलाय) सांगतात, ‘मैदानावर त्याच्याइतका शिस्तबद्ध खेळाडू क्वचितच आढळेल. तो मीरा रोड ते कलिना असा प्रवास दररोज करायचा अन् त्याला पोहोचण्यास उशीर झाल्याचं किंवा त्यानं प्रशिक्षणाला दांडी मारल्याचं चित्र आम्ही कधीच पाहिलेलं नाही. प्रशिक्षक बनल्यानंतर देखील खालिद त्याचप्रमाणं वागला. त्याला भारतीय फुटबॉलची, खेळाडूंची अक्षरश: इत्थंभूत माहिती आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. जमीलला कुठल्या खेळाडूला संधी द्यायची अन् त्याच्याकडून उत्कृष्ट कामगिरी कशा पद्धतीनं करून घ्यायची याचंही अगदी अचूक ज्ञान आहे’…
खालिद जमील व अन्य भारतीय प्रशिक्षक यांच्यातील सर्वांत मोठा फरक म्हणजे त्यांनी कधीही वापर केला नाही तो ‘शॉर्ट कट’चा. जमीलनी ‘मुंबई एफसी’चा अक्षरश: पाया घातला अन् 2017 मध्ये साऱ्या फुटबॉल रसिकांना धक्का दिला तो ‘आयझोल एफसी’च्या खिशात ‘आय-लीग’चं जेतेपद जमा करून. त्या क्षणानं भारतीय फुटबॉल इतिहासात नि:संशयपणे अगदी वरचं स्थान पटकावलंय…बिमल घोष हे सुद्धा गॉडफ्रे पेरेरांचीच री ओढत सांगतात, ‘लोक विसरतात की, खालिद मागच्या दारानं घुसलेला नाहीये. त्यानं प्रशिक्षकपदाचा, विविध संघांच्या ड्रेसिंग रूमचा भरपूर अनुभव घेतलाय. फारसं बजेट नसलेल्या क्लबापासून अत्यंत श्रीमंत संघांपर्यंत मार्गदर्शक म्हणून काम पाहिलंय’…
स्टीव्हन डायस हे ‘एअर इंडिया’ व ‘महिंद्रा’मधील त्यांचे साथीदार आणि त्यांच्या सध्याच्या ‘जमशेदपूर एफसी’ संघाचे अंतरिम प्रशिक्षक. त्यांच्या मते, खालिदच्या मार्गदर्शनाखाली खेळताना कुठल्याही खेळाडूला प्रचंड भार डोक्यावर ठेवलाय असं वाटत नाहीये. त्याला प्रत्येक खेळाडूच्या क्षमतेची पूर्ण माहिती असून जेव्हा मी त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळलो तेव्हा त्यानं मला आक्रमण करण्याची परवानगी दिली होती. मला कुठल्या पद्धतीनं खेळायला आवडतंय याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्याच्याबरोबर साहाय्यक प्रशिक्षक म्हणून वावरताना प्रतिस्पर्धी संघांचं केलेलं विश्लेषण आणि गृहपाठ मी पाहिलाय’…
खालिद जमील ‘पीआर’वर भर देणाऱ्या वर्गातून आलेले नाहीत अन् सोशल मीडियाचा देखील ते वापर करत नाहीत. ते फारच कमी बोलतात अन् कमी शब्दांच्या वापरांच्या साहाय्यानं योग्य संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचं काम करतात. जमीलना जाणणाऱ्यांच्या मते, त्यांनी कधीही ‘थँक यू’ वा ‘सॉरी’ म्हटलेलं नाहीये, त्यांना हवे असतात ते फक्त चांगले निकाल. कदाचित त्यांच्या या गुणामुळंच ते अन्य प्रशिक्षकांहून वेगळे ठरत असावेत…अखिल भारतीय फुटबॉल महासंघानं त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळं अन्य भारतीय प्रशिक्षकांचा देखील उत्साह खात्रीनं वाढेल…विश्लेषकांनी खालिद जमील यांचं वर्णन केलंय ते भारतातील सध्याचे सर्वोत्तम प्रशिक्षक असं…‘सेंट्रल एशियन फुटबॉल असोसिएशन’ (काफा) ‘नेशन्स कप’ स्पर्धेनंतर त्यांना अतिशय महत्त्वाच्या ‘एशियन कप’ स्पर्धेतील सिंगापूरविरुद्धच्या पात्रता फेरीतील सामन्याची तयारी करावी लागणार…फुटबॉलवर अन्नाप्रमाणं प्रेम करणाऱ्या या प्रशिक्षकांचा भविष्यकाळ कसा राहील ते मात्र आताच सांगणं कठीण !
भारतीय प्रशिक्षकपदाकडील वाटचाल…
- सुखविंदर सिंग यांच्यानंतर गोव्याच्या आर्मांदो कुलासो व सावियो मदेरा यांनीही भारतीय संघांचं प्रशिक्षकपद सांभाळलेलं असलं, तरी त्यांची नेमणूक केली होती ती अंतरिम मार्गदर्शक म्हणून. त्यांच्यापूर्वी 2011 मध्ये अखिल भारतीय फुटबॉल महासंघानं हकालपट्टी केली होती ती बॉब हाऊटन यांची…
- अखिल भारतीय फुटबॉल संघटनेनं खालिद जमील यांच्याशी दोन वर्षांचा करार केलाय अन् तो एका वर्षान वाढविण्याची तरतूद सुद्धा केलीय. जमील यांच्या मनात होतं ते थेट तीन वर्षांच्या करारवर स्वाक्षरी करण्याचं…
- खालिद यांनी सूत्रं हाती घेतल्यानंतर पूर्वीचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी वगळलेल्या अव्वल गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूला पुन्हा संघात स्थान दिलंय…
- भारतातील प्रमुख लीगमधील तब्बल 225 सामन्यांत त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावलेली असली, तरी कुठल्याही वयोगटातील भारतीय संघाचं प्रशिक्षकपद सांभाळण्याची संधी त्यांना मिळालेली नव्हती…
- संजॉय सेन, रेनेडी सिंग, मेहराजुद्दीन वाडू, एस. वेंकटेश, शंकरलाल चक्रवर्ती, संतोष कश्यप, इश्फाक अहमद तसंच माजी भारतीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टनटाइन व स्लोव्हाकियाचे स्टेफान टार्कोविच यांचीही भारतीय संघाला मार्गदर्शन करण्याची इच्छा होती. परंतु भारताचे माजी कर्णधार व तांत्रिक समितीचे अध्यक्ष आय. एम. विजयन यांनी केलेली सूचना अन् खालिद जमील यांच्या तगड्या आव्हानानं अन्य प्रशिक्षकांना गारद केलं…
खेळाडू ते प्रशिक्षक…
- खालिद यांनी सुरुवात केली ती ‘महिंद्रा युनायटेड’सह. 1998 मध्ये ते ‘एअर इंडिया’त दाखल झाले…त्यानंतर 2002 मध्ये ते ‘महिंद्रा युनायटेड’मध्ये परतले, परंतु वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे त्यांच्या खेळावर मर्यादा पडल्या अन् शेवटी लवकर निवृत्ती घ्यावी लागली. नंतर त्यांनी ‘मुंबई एफसी’सोबत करार केला, पण कधीही स्पर्धात्मक सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही…
- माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेले जमील हे भारतातर्फे 40 सामने खेळलेत…2009 साली 32 व्या वर्षी त्यांनी प्रशिक्षकपदाच्या क्षेत्रात उडी घेऊन मुंबई एफसीला तब्बल सहा वर्षं मार्गदर्शन केलं. नंतर ते ‘आयझोल एफसी’कडे वळले. याशिवाय भारतातील दोन सर्वांत प्रतिष्ठित क्लब ईस्ट बंगाल व मोहन बागान यांचे प्रशिक्षक म्हणून केलेलं कामही त्यांच्या खात्यात जमा…
- 48 वर्षीय खालिद जमील नवीन नियुक्तीपूर्वी सांभाळत होते ते ‘आयएसएल’मधील ‘जमशेदपूर एफसी’चं मुख्य प्रशिक्षकपद. या संघाला त्यांनी 2024-25 हंगामात मिळवून दिलं पाचवं स्थान…‘आयएसएल प्लेऑफ’साठी पात्र ठरलेल्या संघांचा विचार करता ते असं यश पाहणारे एकमेव भारतीय प्रशिक्षक. 2020-21 मधील मोहिमेत ‘नॉर्थईस्ट युनायटेड’समवेत त्यांनी हा पराक्रम केला…
- ‘अंडरडॉग’ संघांकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याच्या क्षमतेसाठी ते ओळखले जातात…याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘आयझेल एफसी’. केवळ 2 कोटी रुपयांचं ‘बजेट’ असलेल्या या संघानं 2016-17 च्या मोसमातील ‘आय-लीग’मध्ये चक्क मोहन बगान, ईस्ट बंगाल व बेंगळूर एफसीसारख्या बलाढ्या संघांना धूळ चारत बाजी मारली…
- वरिष्ठ फुटबॉल लीग खेळाडू व प्रशिक्षक म्हणूनही जिंकणाऱ्या काही मोजक्या व्यक्तींपैकी ते एक. आधी त्यांनी खेळाडू या नात्यानं 2005 मध्ये ‘महिंद्रा युनायटेड’सह ‘नॅशनल फूटबॉल लीग’चं विजेतेपद मिळविलं आणि 12 वर्षांनी प्रशिक्षक म्हणून त्याची ‘आय-लीग’मध्ये पुनरावृत्ती घडविली ती ‘आयझोल एफसी’ला किताब मिळवून देऊन…
– राजू प्रभू









