गणेशोत्सव-श्री विसर्जन शांततेत पार पाडण्याचा चंग
बेळगाव : गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी पोलीस दलाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. संपूर्ण बंदोबस्तावर निरीक्षण करण्यासाठी राज्य राखीव दलाचे आयजीपी संदीप पाटील हे बेळगावात दाखल झाले आहेत. बुधवारी दुपारी पोलीस आयुक्त कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर बंदोबस्तासाठी आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्ग व विसर्जन तलावांची पाहणी केली आहे. बुधवार दि. 3 सप्टेंबर रोजी संदीप पाटील यांचे बेळगावात आगमन झाले. याबरोबरच राज्य सरकारने नियुक्त केलेले आयपीएस अधिकारी रिष्यंत व श्रीधर हेही बेळगावात दाखल झाले आहेत. दुपारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी आयजीपी संदीप पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाने बंदोबस्ताची व्यापक तयारी केली आहे. बंदोबस्ताचे निरीक्षण आयजीपी संदीप पाटील हे करणार आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बहुतेक गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करून उत्सवाच्या काळात काय करावे? काय करू नये? याची सूचना दिली आहे.बुधवारी झालेल्या बैठकीत पोलीस निरीक्षक, एसीपी, पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस यांच्यासह बेळगावातील बहुतेक अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीनंतर मिरवणूक मार्गावरून जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कपिलेश्वर मंदिराजवळील नव्या व जुन्या तलावांना भेटी देऊन पाहणी केली. बेळगाव शहर व तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या व श्री विसर्जनासाठी सध्या उपलब्ध असलेल्या तलावांची संख्या आदींवरही चर्चा करण्यात आली.
या बैठकीपूर्वी आपली भेट घेतलेल्या पत्रकारांना पोलीस आयुक्तांनी संपूर्ण बंदोबस्ताची माहिती दिली आहे. श्री विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी 1 आयजीपी, पोलीस आयुक्त, 7 एसपी, एएसपी, 25 डीएसपी, 87 पोलीस निरीक्षक, 240 उपनिरीक्षक व साहाय्यक उपनिरीक्षक, 400 होमगार्ड, जलद कृती दलाची 1 कंपनी, राज्य राखीव दलाच्या 10 व सीएआरच्या 9 तुकड्या बंदोबस्तासाठी जुंपण्यात येणार आहेत, असे सांगितले. महानगरपालिकेबरोबर सतत संपर्कात आहे. कारण संपूर्ण व्यवस्था मनपा करते. कर्नाटकातील काही ठिकाणी घडलेल्या वीज दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमशीही सतत संपर्क ठेवून वीजतारा उंच करण्यासंबंधीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. श्री विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणारे वृद्ध, लहान मुले, महिला व इतर गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी बेळगाव येथील वाहतूक पोलिसांच्या मदतीला बेंगळूर व म्हैसूर येथील वाहतूक पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.
मंडळांना विनंती…
श्रीमूर्तींची उंची व सध्या उपलब्ध असलेल्या विसर्जन तलाव यांचा ताळमेळ लक्षात घेऊन काही मंडळांना जक्कीनहोंडा येथे विसर्जन करण्यासंबंधी विनंती करण्यात आली आहे. गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसाठी मिरवणुकीत कोणी फटाके फोडू नयेत, ज्यांना फटाके फोडायचे आहेत त्यांनी मैदानावर फोडावेत. गर्दीत फटाके फोडू नयेत, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे. पोलीस दलाकडून कोणावरही दबाव घातला नाही. तलावांचा विचार करून काही मंडळांना विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.









