महानगरपालिकेकडून तयारी : विशेष करून कपिलेश्वर जुना-नव्या तलावावर अधिक लक्ष केंद्रित
बेळगाव : गणेश विसर्जन व्यवस्थितरित्या पार पडावे यासाठी महानगरपालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शनिवार दि. 6 रोजी अनंत चतुर्दशीदिवशी शहर व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विविध तलावांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. विशेष करून महापालिकेने कपिलेश्वर जुना व नव्या तलावावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही ठिकाणी त्या दिवशी सकाळच्या सत्रात 60 अधिकारी व कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. तर रात्रीच्यावेळी 40 अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत. याबाबतचा आदेश मनपा आयुक्त शुभा बी. यांनी नुकताच जारी केला आहे.
बेळगावच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. पुणे मुंबईच्या धरतीवर हा सण साजरा होत असल्याने दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्हा प्रशासनाकडून गणेशोत्सव आणि विसर्जनाची रंगीत तालिम घेतली जात आहे. पोलीस खाते, महानगरपालिका, हेस्कॉम, वनखाते, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यासह विविध खात्यांचे अधिकारी सातत्याने एकमेकांच्या संपर्कात आहेत. विविध सार्वजनिक मंडळांना भेटीगाठी देऊन माहिती घेण्यासह विसर्जन मार्गाचीदेखील पाहणी केली जात आहे.
विसर्जन मार्गावरील अडथळे व रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येत आहेत. शहरात 370 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यापैकी बहुतांश मंडळांकडून गणेशमूर्ती विसर्जनासाठी जुन्या आणि नव्या कपिलेश्वर तलावाकडे आणल्या जातात. त्याचबरोबर जक्कीन होंड, अनगोळ येथील लाल तलाव, कलमेश्वर तलाव जुने बेळगाव, ब्रह्मदेव मंदिर मजगाव, किल्ला तलाव, कणबर्गी व नाझर कॅम्प वडगाव या ठिकाणीही गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे या तलावांच्याठिकाणी महापालिकेकडून यापूर्वीच आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
निर्माल्य तलावात टाकण्यात येऊ नये, यासाठी निर्माल्य कुंडांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तलावांची स्वच्छता व रंगरंगोटीसाठी 66.80 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर 24 क्रेनची व्यवस्था करण्यात आली असून या क्रेन सर्व तलावांवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विसर्जन व्यवस्थितरित्या पार पडावे, यासाठी जुन्या व नव्या कपिलेश्वर तलाव परिसरात महापालिकेचे आरोग्य व स्वच्छता निरीक्षक यासह त्यांचे सहकारी 24 तास नियुक्त करण्यात आले आहेत. सकाळच्यावेळी 30 तर रात्रीच्या वेळी 40 अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी तैनात असणार आहेत.
24 क्रेनसाठी 18 लाखांचा निधी खर्च
24 क्रेनसाठी महानगरपालिकेकडून 18 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.एकंदरीत अनंत चतुर्दशीदिवशी सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन व्यवस्थितरित्या पार पडावे, कोणत्याही प्रकारची उणीव भासू नये, यासाठी महानगरपालिकेकडून आवश्यक त्या सर्व खबरदारी घेण्यात आल्या आहेत. बुधवारी महापालिकेत पार पडलेल्या आरोग्य स्थायी समितीच्या तातडीच्या बैठकीतदेखील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत. शहर स्वच्छता व विसर्जन तलाव परिसरात कोणतीही उणीव भासणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे.









