रस्त्यावर फेकले जाताहेत नवजात शिशू : जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांत 44 मुलांचे रक्षण
बेळगाव : समाजात मुले नसलेली दाम्पत्ये मूल होण्यासाठी झुरणी घेत असतात. पण काही माता जन्म दिलेल्या अपत्याला रस्त्याच्या बाजूला, कुंपणात, पडक्या इमारतीमध्ये फेकून देत असतात. अशी प्रकरणे अलीकडे वाढीस लागली असून, जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत 44 अपत्यांचे रक्षण करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शहराबरोबर जिल्ह्यातील तालुकास्तरावर शौचालय, रस्ते, गटार आदी ठिकाणी फेकून देण्यात आलेल्या नवजात शिशूंचे बालरक्षण विभागाकडून संरक्षण करण्यात आले आहे. या मुलांच्या पालकांचा शोध न लागल्याने गेल्या तीन वर्षांत जवळजवळ 44 मुलांचे रक्षण करून त्यांचे संगोपन करण्यात आले आहे. सरकारने वेगवेगळे कायदे अस्तित्वात आणले तरी नवजात शिशूंना रस्त्याच्या बाजूला फेकून देण्याचे प्रकार काही थांबलेले नाहीत.
केंद्रीय संपन्मूल प्राधिकरण व राज्य बालरक्षण संचालनालयाच्या जिल्हा बालरक्षण विभागांतर्गत जिल्ह्यात सरकारी विशेष दत्तक केंद्र व स्वामी विवेकानंद दत्तक स्वीकार केंद्रे कार्यरत आहेत. येथे अनाथ व फेकून देण्यात आलेल्या बालकांचे इतर बालकांप्रमाणे ममता, वात्सल्याने संगोपन करण्यात येते. त्याशिवाय अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या त्याचबरोबर रुग्णालयाचे कर्मचारी शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे. नको असलेले मूल किंवा कोणत्याही कारणाने नवजात शिशूला फेकून देण्याऐवजी संबंधित जन्मदात्रीचे जीवन सुलभ करून देण्याच्या उद्देशाने सरकारने काही वर्षांपूर्वी ‘ममतेचा पाळणा’ ही योजना सुरू केली. मात्र येथे नवजात शिशूंना आणून ठेवण्याऐवजी फेकून देण्याचे प्रकारच वाढले आहेत. जिल्ह्यामध्ये अलिकडेच रेल्वेस्थानक, स्वामी विवेकानंद बालक दत्तक केंद्र, जिल्हा रुग्णालय याठिकाणी ममतेचा पाळणा सुरू करण्यात आला आहे. जन्मदात्रींना नको असलेले मूल फेकून न देता या पाळण्यामध्ये ठेवून गेल्यास त्या शिशूचे महिला रक्षण विभागाकडून संगोपन करण्यात येते, असे अधिकारी सांगतात.
बेकायदेशीर विक्री केल्यास शिक्षा
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 8 हून अधिक नवजात शिशूंना सोडून देण्याची प्रकरणे दाखल झाली आहेत. एखाद्यावेळी जन्मदात्रीला नवजात शिशू नको असल्यास ते बालरक्षण विभागाकडे पोहोचविल्यास त्याचे सुरक्षितपणे संगोपन करण्यात येते. कायदेशीरपणे सरकार सर्वकाही प्रक्रिया पूर्ण करते. विभागाकडे शिशूला सोपविणाऱ्यांची माहिती गुप्त ठेवण्यात येते. शिशूची बेकायदेशीरपणे विक्री केल्यास 5 वर्षांची शिक्षा व 1 लाख रुपये दंड ठोठावण्यात येतो.
37 मुलांना दत्तक
नवजात शिशूंच्या आरोग्याची परीक्षा करण्यात येते.त्यानंतर त्यांचे पालक न मिळाल्यास बालरक्षण विभागाकडून त्याचे संगोपन करण्यात येते. मुले नसलेली दाम्पत्ये कायदेशीरित्या दत्तक घेण्यासाठी केंद्रीय दत्तक संपन्मूल प्राधिकरणाकडे अर्ज केलेल्यांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत 37 मुलांना दत्तक नियमानुसार पात्र दाम्पत्याकडे सोपविण्यात आले आहे. काही मुलांना विदेशी नागरिकांनी दत्तक घेतले आहे, अशी माहिती बालरक्षण विभागाकडून मिळाली आहे.









