वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने 4 जून रोजी त्याच्या संघाच्या आयपीएल विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल उघडपणे आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, आयुष्यातील कोणतीही गोष्ट तुम्हाला खरोखर अशा 11 बळी जाण्यासारख्या हृदयद्रावक घटनेसाठी तयार करत नाही. खरे तर तो त्याच्या संघासाठी सर्वात आनंदाचा दिवस असायला हवा होता.
आरसीबीच्या पहिल्या आयपीएल जेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर अंदाजे 2.5 लाख चाहत्यांनी गर्दी केली असता ही दु:खद घटना घडली होती. ‘आयुष्यातील कोणतीही गोष्ट तुम्हाला खरोखरच 4 जूनसारख्या हृदयद्रावक घटनेसाठी तयार करत नाही. आमच्या संघाच्या इतिहासातील सर्वांत आनंदाचा क्षण दु:खद क्षणात बदलला’, असे कोहलीने आरसीबीच्या ‘एक्स’ हँडलवर म्हटले आहे. ‘मी प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांचा आणि जखमी झालेल्या आमच्या चाहत्यांचा विचार आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत आलेलो आहे. तुमचे नुकसान आता आमच्या कहाणीचा एक भाग आहे. एकत्रितपणे आम्ही काळजी, आदर आणि जबाबदारीने पुढे जाऊ’, असे त्याने संघावर व्यापक टीका झालेल्या या दुर्घटनेसंदर्भातील त्यांच्या पहिल्याच सविस्तर टिप्पणीत म्हटले आहे.
या घटनेच्या अधिकृत चौकशीत योग्य परवानग्यांचा अभाव आणि प्रचंड गर्दीमुळे गोंधळ उडाल्याचे दिसून आले होते. संघाने पाठवलेल्या सोशल मीडियावरील निमंत्रणांना प्रतिसाद देत गर्दी वाढली होती. पोलिसांनी नंतर मान्य केले की, गर्दी हाताळण्याच्या दृष्टीने त्यांची संख्या खूपच कमी होती. चाहत्यांना मोठ्या प्रमाणात येण्यास प्रोत्साहित केल्याबद्दल चौकशीत आरसीबीला जबाबदार धरण्यात आले होते.
त्यानंतर, आरसीबीने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख ऊपयांची भरपाई जाहीर केली होती आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘अर्थपूर्ण कृती’ करण्याचे वचन दिले. त्यांनी आरसीबी केअर्स नावाची एक संस्था देखील सुरू केली आहे. या संस्थेने गर्दीचे चांगले व्यवस्थापन करण्यासाठी स्टेडियम अधिकारी, क्रीडासंस्था आणि लीग भागीदारांसोबत काम करण्याचे आश्वासन दिले आहे.









