वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग
सतरा वर्षीय विकेटकीपर-बॅटर कराबो मेसोला बुधवारी भारत आणि श्रीलंकेत या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या महिला एकदिवशीय विश्वचषकासाठी द. आफ्रिकेच्या 15 सदस्यीय संघात पहिल्यांदाच स्थान मिळाले.
यावर्षी मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-20 मध्ये वरिष्ठ संघाकडून पदार्पण करणाऱ्या मेसोने आतापर्यंत दोन एकदिवशीय आणि पाच टी-20 सामने खेळले आहेत. 2023 आणि 2025 मध्ये दोन अंडर 19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेतल्यानंतर ती तिच्या पहिल्या वरिष्ठ विश्वचषकात भाग घेणार आहे. संघात माजी कर्णधार डेन व्हॅन नीकेर्कचा समावेश नाही. ज्यांनी यापूर्वी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. स्पर्धेपूर्वीच्या शिबिरात समावेश असूनही नीकेर्कला संघात स्थान मिळणार नाही, अशी अपेक्षा होती. संघाचे नेतृत्व लॉरा वोल्वार्ड करणार आहे आणि माजी कर्णधार सुने लुस, मॅरिझान कॅप, क्लो ट्रायॉन आणि अयाबोंगा खाका अनुभवी खेळाडूंचा संघात समावेश आहे.
द. आफ्रिका 3 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे होणाऱ्या स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळेल तर स्पर्धेतील यजमान भारताविरुद्ध त्यांचा सामना 9 ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणम येथे होईल. हाच संघ विश्वचषक स्पर्धेसाठी लाहोर येथे पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवशीय मालिका 16, 19 आणि 22 सप्टेंबर रोजी खेळणार आहे.
संघ: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), अयाबोंगा खाका, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, मारिझान कॅप, तझमिन ब्रिट्स, सिनालो जाफ्ता, नॉनकुलुलेको म्लाबा, अॅनेरी डेर्कसेन, अनेके बॉश, मसाबता क्लास, सुने लुस, मीन लूस, काराबुका, मेरिझन शांगासे, प्रवास राखीव, मियाने स्मित.









