वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय नागरीकांचा रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा, म्हणून रेल्वे विभागाने आता 15 हजार किलोमीटर लांबीच्या गर्दीच्या रेल्वेमार्गांसाठी ‘कवच-4’ची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. या रेल्वेमार्गांपैकी 14 हजार 954 किलोमीटर लांबीच्या मार्गांना सुरक्षा पुरविण्याची कंत्राटे यापूर्वीच देण्यात आली आहेत, अशी माहिती आहे.
दक्षिण-मध्य रेल्वेने 1 हजार 465 किलोमीटर अंतरासाठी ‘कवच-3.2’ या आवृत्तीचा उपयोग चालविला आहे. आता कवचची व्याप्ती आणखी वाढविली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. कवच हे सुरक्षा तंत्रज्ञान भारतीय रेल्वेने स्वत: विकसीत केले असून ते रेल्वेच्या लखनौ येथील संशोधन संरचना आणि मानक संस्थेने (आरडीएसओ) स्वत:च्या प्रयोगशाळेत विकसीत केलेले आहे. त्याची 4.0 ही आवृत्ती गेल्यावर्षी विकसीत करण्यात आली असून ती अत्याधुनिक आहे, असे स्पष्ट केले गेले आहे.
उपयोग करण्यासाठी सज्ज
कवच सुरक्षा यंत्रणेची चवथी आवृत्ती मागच्या आवृत्यांपेक्षा अधिक सरस आणि प्रभावी आहे. रेल्वेमार्गांवर कोणतेही अडथळे किंवा अगदी छोट्या वस्तू जरी कोणी टाकल्या असतील, तरी त्यांची माहिती रेल्वेचालकाला आधी मिळते. त्यामुळे तो रेल्वे थांबवू शकतो. तसेच एकाच रेल्वेमार्गावर दोन रेल्वे गाड्या येऊन होणारे अपघात या यंत्रणेमुळे टाळले जातात. या यंत्रणेच्या चौथ्या आवृत्तीत अधिक अचूकता, सिग्नल आहे की नाही याची माहिती, रेल्वेमार्ग मोकळा आहे की नाही याची माहिती आणि इतर सुरक्षा संबंधी माहिती चालकाला, तसेच संबंधित रेल्वेस्थानकाला मिळते. यामुळे रेल्वेचा वेग नियंत्रणात आणून ती थांबविण्यासाठी आवश्यक असणारा समय चालकाला मिळतो. परिणामी रेल्वे अपघातांच्या घटना बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
जुन्या आवृत्त्यांचे नूतनीकरण
कवच या यंत्रणेच्या 3.2 आवृत्तीचे नूतनीकरण 4.0 या आवृत्तीत करण्यासाठीही रेल्वेने योजना निर्माण केली आहे. कवच या सुरक्षा यंत्रणेवर सातत्याने रेल्वेच्या विविध प्रयोगशाळांमध्ये विविध प्रयोग करण्यात येत असून नवीन आवृत्त्या अधिक सक्षम आणि अचूकरित्या काम करणाऱ्या असतील याची खबरदारी घेण्यात येत आहे. येत्या काही वर्षांमध्ये या यंत्रणेत आणखी सुधारणा केल्या जाणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या किमान 30 हजार कर्मचाऱ्यांना ही यंत्रणा कशी उपयोगात आणायची, याचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे कर्मचारी आता अचूकपणे या यंत्रणेचा उपयोग करण्यासाठी सक्षम झाले असून त्याचा परिणाम म्हणून रेल्वेच्या अपघातांमध्ये घट झालेली लोकांना काही कालावधीतच पहावयास मिळेल. यामुळे प्रवाशांच्या भारतीय रेल्वेवरच्या विश्वासात अधिक वाढ होईल आणि प्रवाशांची संख्या वाढेल, अशी रेल्वेविभागाची रास्त अपेक्षाही आहे.
प्रचंड यंत्रणा
कवच सुरक्षा यंत्रणेचा विस्तार प्रचंड असून येत्या काही वर्षांमध्ये भारतातील सर्व रेल्वेंना या यंत्रणेच्या सुरक्षा कवचाच्या अंतर्गत आणण्यात येणार आहे. आतापर्यंत 1 हजार 290 रेल्वे इंजिनांमध्ये ही यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली आहे. 5 हजार 867 किलोमीटर लांबीची केबल घालण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 708 रेल्वे स्थानकांना या यंत्रणेशी जोडण्यात आले असून आतापर्यंत या यंत्रणेच्या विकासावर 2 हजार 15 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ही यंत्रणा पूर्णत: कार्यरत झाल्यानंतर रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होईल, अशी शक्यता आहे.









