दिल्लीत दोन दिवसाच्या जीएसटी परिषदेची बैठक बुधवारी सुरु झाली, आज ती संपेल व त्यात जे निर्णय होतील ते देशासाठी व देशवासीयांसाठी आनंददायी असतील. जनतेसाठी स्वस्ताई, उत्पादकांना वाढती मागणी आणि कर संकलनातही वाढ अशी त्रिसूत्री, भारतहिताची भूमिका घेतली जाणार हे निश्चित. भारत झुकेगा नही, कोणतीही महासत्ता असो किंवा पाकचे दहशतवादी हल्ले अथवा ट्रम्पचे टेरिफ युद्ध भारत झुकणार नाही, आत्मनिर्भर भारत हा बाणा कायम राखत जगातली तिसरी अर्थव्यवस्था होणेपासून भारताला कोणी मागे सरकवू शकत नाही. हाच विश्वास या निमित्ताने व्यक्त होणार आहे. एक काळ होता, महाशक्तींनी डोळे वटारले की हात बांधून भारताचे नेते मान डोलवायला लागत पण आज ती स्थिती नाही. भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था म्हणून पावले टाकत आहे. कुणी धमकावले, टेरिफ युद्ध सुरु केले किंवा भारताला खाली खेचायचा प्रयत्न केला तर त्यांची जागा दाखवायची धमक भारतात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अमेरिकेसह कुणीही अडथळे आणले तर ते परतवायची शक्ती बाळगून आहेत. देश सर्वप्रथम, विश्वगुरु म्हणून जगभर लौकिक आणि आत्मनिर्भरता, मेक इन इंडिया याचा गेल्या दहा वर्षांत जो पाठपुरावा मोदी सरकारने केला आहे, त्याची परिणती म्हणजे आजचा भारत आहे. भारत हा जगातील सर्वाधिक तरुण देश आहे. भारताची विविधता आणि आत्मनिर्भरता भारताला अशा एका उच्चस्थानी घेऊन गेली आहे की, त्यामुळे जगभरच्या जुलमी सत्तांना धडकीच भरावी. अमेरिका फस्ट म्हणत ट्रम्पतात्यांनी भारताशी पंगा घेतला आहे. ट्रम्पचे सल्लागार भारताला चिरडून टाकू वगैरे दर्पोक्ती करत आहेत पण मोदी यांनी फारशी बडबड वा तडजोड न करता भारत भारत आहे हे दाखवून दिले आहे. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत झुकेगा नही असे म्हटले आणि आज जे चित्र समोर येते आहे ते पाहता भारताने एकूण जागतिक व्यापारात अमेरिकेला गृहीत न धरता पावले टाकायची आणि व्यापार उद्दिष्ट पूर्ण करायचे असा निर्धार केलेला दिसतोय. जीएसटी संकलनाची आकडेवारी, सकल राष्ट्रीय उत्पन्न दर जगभरातून भारताला आणि भारत सरकारच्या भूमिकेला मिळत असलेला पाठिंबा पाहता भारत करुन दाखवणार हे आता सर्वांना कळून चुकले आहे. आकडेवारी पण तेच सत्य अधोरेखित करत आहे. सेमीकंडक्टर निर्मिती असो वा देशांतर्गत मागणी, व्यापार यांना प्रोत्साहन देण्यासाठी जीएसटी स्लॅब रचनेत बदल करुन मागणी वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजना असोत ट्रम्प तात्याची बोबडी वळेल अशा त्या आहेत. 15 ऑगस्टला पंतप्रधानांनी यंदाचा दसरा, दिवाळी स्वस्त मस्त होईल, सरकार जीएसटी स्लॅब कमी करेल, कर कमी होतील व अनेक जीवनावश्यक गोष्टी स्वस्त होतील असे म्हटले व स्वदेशीचा मंत्र सांगितला. पावलेही तशी पडत आहेत आणि भारतीय नागरिकांनी देशभक्ती या एका मुद्यावर फक्त मेड इन इंडिया स्वदेशी वस्तू खरेदी केल्या की सारे सूतासारखे सरळ येतील. दोन दिवसांपूर्वी जीएसटी संकलनाची जी आकडेवारी आली आहे, ती उत्तम आहेच. सरकारी आकडेवारीनुसार, वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) संकलन गेल्या पाच वर्षांत दुप्पट झाले असून, 2024-25 या आर्थिक वर्षात ते विक्रमी 22.08 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात हे संकलन 11.37 लाख कोटी रुपये होते. 2024-25 मधील जीएसटी संकलन मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 9.4 टक्के अधिक आहे. 2025 आर्थिक वर्षात सरासरी मासिक संकलन 1.84 लाख कोटी रुपये होते, तर 2024 मध्ये 1.68 लाख कोटी रुपये आणि 2022 मध्ये 1.51 लाख कोटी रुपये होते. केंद्र आणि राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असलेल्या ‘जीएसटी’ परिषदेने कर अनुपालन सुलभ करावे, कराचे स्तर तीनपर्यंत कमी करावेत आणि पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटीखाली आणून त्याचा आवाका वाढवावा, असे ‘पीडब्ल्यूसी इंडिया’च्या सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. गेल्या आठ वर्षांत, सरासरी मासिक जीएसटी संकलन 2017-18 मधील 90,000 कोटी रुपयांवरून 2024-25 (एप्रिल-मार्च) मध्ये 1.84 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.
एप्रिल 2025 मध्ये संकलनाने 2.37 लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. सध्या, जीएसटीची 5, 12, 18 आणि 28 टक्के अशी चारस्तरीय कररचना आहे. चैनीच्या आणि हानिकारक वस्तूंवर 28 टक्के सर्वोच्च दराने जीएसटी आकारला जातो. पॅकबंद अन्न आणि आवश्यक वस्तूंवर पाच टक्के ‘जीएसटी’ आकारला जातो. सध्याच्या चारस्तरीय ‘जीएसटी’ ऐवजी तीन स्तरांत ‘जीएसटी’ आकारला गेल्यास विवाद कमी होतील, कराची निश्चितता सुधारेल आणि अनुपालन सोपे होईल, असा दावा करणेत आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी चीन, रशियासह जगभरच्या 40 देशांची बांधलेली वज्रमूठ ट्रम्पचे सारे मनसुबे आणि मनमानी मोडून टाकेल, असे चित्र आहे. भारत-चीन-रशिया ही शक्तीशाली आघाडी तयार होण्याचा धोका अमेरिका पत्करत आहे, असा इशारा ट्रम्प यांना मिळाला आहे. “चिनी, रशियन आणि भारतीय हे जर कोणत्याही स्वरूपातील आर्थिक आणि काही प्रमाणात लष्करी आघाडीत एकत्र आले, तर अमेरिकन लोकांना 21व्या शतकात स्पर्धा करणे शक्यच होणार नाही, असे विश्लेषण पुढे आले आहे. दरम्यान आपल्याला ई-बाईक आणि सेमीकंडक्टर चिप बनवण्यात आलेले यश हे भारताचा व्यापार वाढणार असे सांगत आहे. जीएसटी संकलनाचे आकडे जसे उत्तम आले आहेत त्याच जोडीला विकास दर अपेक्षेपेक्षा उत्तम आला आहे. ट्रम्प यांच्यासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. जगातील वेगवेगळ्या देशांविरुद्ध टॅरिफचा बडगा उचललेल्या अमेरिकेसाठी मूडीजने धोक्याची घंटा वाजवली आहे. जगावर टॅरिफ बॉम्ब टाकून आपली ताकद दाखवणारा अमेरिका स्वत:च गंभीर मंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आज गुरुवारी जीएसटी कौन्सिल काय व कसे निर्णय घेते कोणकोणत्या गोष्टी स्वस्त होतात, मेक इन इंडियाचा वेग किती विस्तारतो, हे पहावे लागेल. तूर्त दिवाळी स्वस्त होणार आणि भारत आपली आत्मनिर्भरता अधोरेखित करणार, हाच आनंद आहे. भारत झुकणार नाही हा निर्धारही आनंददायी आहे.








