सलग 11 वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाचे राज्य आहे. मात्र, अद्यापही त्यांची लोकप्रियता पूर्वीप्रमाणेच आहे. ही वस्तुस्थिती अनेक वृत्तसंस्थांनी केलेल्या सर्वेक्षणांच्या आधारे जशी सिद्ध होत आहे, तशीच सर्वसामान्य माणसांच्या काही उपक्रमांमधूनही स्पष्ट होत आहे. विद्यार्थी, मध्यमवयीन आणि वृद्ध अशा विविध वयोगटांमधील लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानतात, हे दिसून येणाऱ्या अनेक घटना आहेत. नुकतीच ओडीशा राज्यातील काही विद्यार्थ्यांनी त्यांची चॉकलेटची मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती सध्या देशभर चर्चेचा विषय झाली आहे. ही मूर्ती ओडीशाची राजधानी भुवनेश्वर येथील ‘क्लब चॉकलेट’ नामक एका अन्नप्रक्रिया प्रशालेत पदविका अभ्यासक्रमाच्या 15 विद्यार्थ्यांनी साकारली आहे. यासाठी 70 किलो चॉकलेटचा उपयोग करण्यात आला आहे. याचॉकलेटपैकी 55 किलो ‘डार्क चॉकलेट’ तर 15 किलो ‘व्हाईट चॉकलेट’ आहे. या दोन रंगांच्या आणि प्रकारांच्या चॉकलेटस्च्या मिश्रणातून या मूर्तीचीं निर्मिती करण्यात आली असून 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी तिचे अनावरण करण्यात येऊन ती या प्रशालेच्या प्रदर्शनात लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येईल.
ही मूर्ती केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुखदर्शन घडविते असे नसून तिच्यावर त्यांनी पुढाकार घेऊन साकारलेल्या आणि लोकप्रिय झालेल्या अनेक सरकारी कल्याणकारी योजनांची चिन्हेही कोरण्यात आलेली आहेत. जन धन योजना, उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान आदी योजनांची बोधचिन्हे तर या मूर्तीवर आहेतच. त्याचप्रमाणे पाकिस्तानचा माज उतरविणारे ‘सिंदूर अभियान’ आणि भारताची अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ने गाजवलेले पराक्रमही या मूर्तीतून आपल्यापर्यंत पोहचतात. येत्या 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षांचे होणार आहेत. त्यानिमित्त या मूर्तीचे निर्माणकार्य करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या संदर्भातला अशा प्रकारचा हा देशातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी साकारलेला हा प्रथम उपक्रम आहे, अशी चर्चा आहे. या मूर्तीचे अनावरण झाल्यानंतर ती जेव्हा सर्वसामान्यांना पाहण्यासाठी उपलब्ध केली जाईल, तेव्हा ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच लोकप्रिय होईल, असा विश्वास या शिक्षणसंस्थेने, तसेच निर्मात्या विद्यार्थ्यांनीही व्यक्त केला आहे. इंटरनेटवरही यूट्यूब आणि इतर प्रसार माध्यमांच्या साहाय्याने या मूर्तीचे दर्शन भारतातील आणि जगातील सर्व नागरीकांना घडविण्याची विद्यार्थ्यांची योजना आहे.









