आनंदा झोरे हा मुंबई येथे नोकरीनिमित्त राहत होता
By : संतोष कुंभार
शाहूवाडी : गणपती विसर्जनासाठी गावाकडे आलेल्या 31 वर्षीय तरुणाचा पाझर तलाव, पठाराचा वाडा (ता. शाहूवाडी) येथे बुडून मृत्यू झाल्याची नोंद शाहूवाडी पोलीसांत झाली. आनंद काळू झोरे (वय 31, रा. येळवण जुगाई, पठाराचा वाडा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, आनंदा झोरे हा मुंबई येथे नोकरीनिमित्त राहत होता. गणेशोत्सवासाठी तो गावी आला होता. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आनंदा झोरे हा गणपती विसर्जन करण्यासाठी गावानजीक असलेल्या तलावात गेला होता. गणपती विसर्जन झाल्यानंतर बराच वेळ झालं तो वरती आला नाही. त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. तीन सप्टेंबर रोजी सकाळच्यादरम्यान त्याचा मृतदेह तलावात आढळून आला.
त्याच्या मागे आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. शवविच्छेदन मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले. या घटनेचा तपास शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हणमंत कुंभार हे करत आहेत.








