जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य
बेळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबई येथे मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू होते. या उपोषणाला मंगळवारी यश आले असून राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाने आनंदोत्सव साजरा केला. बेळगावमधील सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलनाला यश आल्याबद्दल आनंद साजरा केला. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी बेळगाव शहरात भव्य मूकमोर्चा काढण्यात आला. गणेशोत्सव व पाऊस असतानाही शेकडोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र आले.
दलित संघटनांनीही पाठिंबा दर्शविल्याने मोर्चाला मोठे यश मिळाले आहे. सोमवारी बेळगावमधील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले होते. मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य करत नवीन जीआर काढला. यामुळे त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव व्यक्त करण्यात आला. बेळगावमध्येही मराठा समाजाने या निर्णयाचे कौतुक करत यापुढेही महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले.
बेळगावमध्ये आज जल्लोष
मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला अभुतपूर्व यश मिळाल्याबद्दल बुधवार दि. 3 रोजी बेळगावमध्ये सकल मराठा व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. सकाळी 10.30 वा. धर्मवीर संभाजी चौक येथे हा कार्यक्रम होणार असून सर्व पदाधिकारी व मराठा समाजाने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









