हातकणंगले / नंदू कुलकर्णी :
‘माणसं जोडणारी आपली माणसं’ ब्रीद असलेले हातकणंगले तालुक्यातील आळते येथील शिवतेज तरूण मंडळ. या शिवतेज परिवाराच्या माध्यमातून आळते येथील शिवतेज तरुण मंडळाने सलग 27 वर्ष गणेशोत्सव साजरी करण्याची परंपरा अखंड ठेवली आहे. संजय ऊर्फ मुरलीधर दीक्षित आणि कै. वैभव हुक्कीरे यांच्यासह मित्रपरिवाराने 1998 साली शिवतेज मंडळाची स्थापना केली.
मंडळाच्या माध्यमातून गणेश चतुर्थी, नवरात्र उत्सव, महापुरुषांच्या जयंती, सुरुवातीला भिशीची स्थापना करून त्याचे रूपांतर शिवतेज ग्रामीण पतसंस्थेत केले. तसेच शिवतेज बालविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरू केले. वर्षभर समाजोपयोगी प्रबोधनात्मक व्याख्यानमाला, श्री धुळेश्वर देवालयाच्या यात्रेतील भक्तांसाठी मोफत अन्नछत्रासह अनेक उपक्रम राबवण्यात शिवतेज परिवार अग्रक्रमावर आहे.
आळते गावातील 14 ते 17 वर्षाच्या वयोगटातील बालगोपालांना 1996 साली एकत्र करून कै. वैभव हुक्कीरे यांनी बालशिवाजी तरुण मंडळ आणि माजी सरपंच संजय ऊर्फ मुरलीधर दीक्षित यांनी रामरहीम तरुण मंडळाची सहकाऱ्यांना घेऊन स्थापना केली. त्यानंतर 1998 साली दोन्ही मंडळे एकत्र येऊन श्री. शिवतेज तरुण मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून आजअखेर दरवर्षी महाप्रसादाचे वाटप सुरू आहे .
सुरुवातीपासूनच विधायक, समाजोपयोगी कार्य करण्याचे तत्व मंडळातील कार्यकर्त्यांनी ठेवले आहे. दीक्षित आणि कै . हुक्कीरेंनी मंडळातील कार्यकर्त्यांची व मित्रांची आर्थिक अडचण दूर व्हावी, या उद्देशाने 1998 साली शिवतेज भिशी मंडळ सुरू केले. भिशीच्या माध्यमातून मंडळातील कार्यकर्त्यांसह त्यांच्या घरातील सदस्य शिवतेज परिवारात जोडले गेले. त्यातून ‘माणसं जोडणारी आपली माणसं’ म्हणजेच शिवतेज परिवार असे ब्रीदवाक्य कामाच्या माध्यमातून तयार झाले. भिशीचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढल्याने संजय दीक्षित, कै. वैभव हुक्कीरे, डॉ. सुरज बुरसे, कै. सुरेश सुतार, बाळासो गुरव आणि कमरुद्दिन मुजावर यांच्यासह मंडळातील सर्व सदस्यांच्या सहकार्याने 2002 साली श्री. शिवतेज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. त्यावेळी ‘जनसामान्यांना अर्थाची साथ देणारी आपली पतसंस्था’ असे ब्रीद पतसंस्थेने ठेवले. आजअखेर पतसंस्थेच्या माध्यमातून हजारो लोकांना कर्ज पुरवठा करून अनेकांचे व्यवसाय उभे राहिले आहेत.
पतसंस्थेच्या माध्यमातून मंडळाची ताकद आणि स्वहिंमतीवर मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्यांची संख्या वाढल्यानंतर मंडळाच्या माध्यमातून 2004-05 पासून श्री. क्षेत्र जोतिबाच्या सहजसेवा ट्रस्ट संचलित मोफत अन्नछत्राच्या धर्तीवर कर्नाटकसह प.महाराष्ट्रातील अनेकांचे आराध्य दैवत असलेले श्री. क्षेत्र धुळोबा यात्रेमध्ये भाविकांच्या सहकार्याने मोफत अन्नछत्र सुरू केले. ते आजतागायत सुरू आहे. मोफत अन्नछत्रांमध्ये आजही यात्रेत येणारे 15 ते 20 हजार भाविक अन्नछत्राचा लाभ घेतात. अन्नछत्रामध्ये प्रमुख सक्रिय सहभाग डॉ. सुरज बुरसे यांचा असतो.
पंचक्रोशीत सक्षम मंडळ म्हणून शिवतेज मंडळाची ओळख झाल्यानंतर मंडळाच्या सदस्यांनी एकत्र येऊन संजय दीक्षित, कै. वैभव हुक्कारे, डॉ. सुरज बुरसे, कै. सुरेश सुतार व अनिल बिद्रे यांच्यासह सदस्यांनी गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा, या उद्देशाने 2008-09 मध्ये श्री. शिवतेज बालविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. विद्यालयाचे सध्या लहान गट, मोठा गट व पहिली ते दहावी असे बारा वर्ग आहेत. स्वत:ची संगणकीय लॅबसह सुसज्ज इमारत, मोठे क्रीडांगण आहे. शिवतेज विद्यालयातून जून 2025 अखेर दहावीच्या सहा बॅचेस पास होऊन बाहेर पडल्या असून 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखत विद्यालय स्व:निधीवर सुरू आहे. सध्या विद्यालयामध्ये 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शिवतेज परिवारातून वर्षभर प्रबोधनात्मक कार्यक्रम, व्याख्यानमाला, कीर्तनकारांचे कार्यक्रम घेतले जातात. मंडळाच्या माध्यमातून काही वर्ष श्री. रामलिंग क्षेत्र प्लास्टिक मुक्त करून श्रावणातील दर सोमवारी खिचडी प्रसादाचे वाटप केले आहे. श्रावणातील दर गुरुवारी श्री दत्त महाराज सोहळा केला जातो, असे विविध समाजापयोगी उपक्रम शिवतेज तरुण मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात.
शिवतेज मंडळाच्या स्थापनेपासून आजअखेर गणेश चतुर्थी, नवरात्र उत्सव, सामाजिक जनजागृतीचे उपक्रम, अन्नछत्र महाप्रसादाचे वाटप, व्याख्यानमाला, पतसंस्था व शिवतेज विद्यालय चालवण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्याकडून व सभासदाकडून वर्गणी स्वीकारली जाते. सर्व उपक्रम स्व:निधीतून राबवले जातात. शिवतेज मंडळ कसलेही पावती बुक घेऊन वर्गणी अथवा देणगी गोळा करत नसून स्व:निधीवर सर्व कार्यक्रमाचे नियोजन करत असते.








