वृत्तसंस्था/ राजगीर, बिहार
गटातील अपराजित मोहिमेमुळे उत्साह, आत्मविश्वास आणि दृढनिश्चय वाढलेल्या भारतीय पुऊष हॉकी संघाला आज बुधवारी येथे आशिया कपच्या सुपर 4 टप्प्यातील पहिल्या सामन्यात विद्यमान विजेते आणि पाच वेळा विजेते राहिलेल्या कोरियाचा सामना करावा लागणार असून यावेळी त्यांनी आपला खेळ उंचावण्याची आवश्यकता असेल.
भारतीय संघाने गट ‘अ’मधील मोहीम सर्व विजयांसह समाप्त केली. त्यानी चीनला 4-3, जपानला 3-2 असे हरवले आणि सोमवारी कझाकस्तानला 15-0 असे पराभूत केले. परंतु निकाल भारताने मोहिमेची सुऊवात कशी केली होती हे फारसे सांगत नाहीत. चीन आणि जपानला चुरशीच्या सामन्यांत मागे टाकण्यात यश मिळविल्यानंतर त्यांनी कझाकस्तानवर दणदणीत विजय मिळवला. कझाकस्तानची या स्पर्धेत सहभागी होण्याची ही दुसरीच खेप होती. परंतु दोन कठीण सामन्यांनंतर भारताला या मोठ्या विजयातून दिलासा मिळू शकतो.
स्पर्धेतील सर्वांत यशस्वी संघ कोरियानेही आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केलेली नाही हे देखील भारताला मदतकारी राहील. ते गट ‘ब’मध्ये मलेशियाच्या मागे दुसऱ्या स्थानावर राहिले आहेत. कोरियन संघ अव्वल स्थानाचा भक्कम दावेदार होता. पण मलेशियाने त्यांना 4-1 असा पराभव पत्करायला लावल्याने त्यांना मोठा धक्का बसला. दुपारच्या सामन्यांमध्ये येथे कडक ऊन आणि उच्च आर्द्रतेचा सामना करताना त्यांना संघर्ष करावा लागला. परंतु सुपर 4 चे सामने संध्याकाळी सुरू होत असल्याने मंगळवारच्या विश्रांतीच्या दिवसानंतर त्यांच्याकडून खेळ उंचावला जाण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.
सोमवारच्या सामन्यात गोलरक्षण, बचाव, मध्य क्षेत्र किंवा आक्रमण असो, भारत खेळाच्या प्रत्येक पैलूत चांगला खेळला. सर्वांत आनंददायी गोष्ट म्हणजे फॉरवर्ड लाइनची कामगिरी. तिथे अभिषेकने चार गोल करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गोलांच्या व्यतिरिक्त अभिषेकने योग्य स्थान पकडणे आणि पहिल्यांदाच चेंडू वर्तुळात आल्यावर त्याने हाणलेले फटके पाहणे अधिक आनंददायी होते. हॅट्ट्रिक करणारा सुखजित सिंग हा आणखी एक असा खेळाडू होता जो त्याच्या वेगवान ड्रिबलिंगने आणि ’डी’ क्षेत्रात शांतपणे वावरण्याच्या क्षमतेमुळे चमकला.
अनुभवी मनदीप सिंगने आतापर्यंत स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे चमकदार कामगिरी केली आहे. भारताच्या आघाडी फळीत एकमेव कच्चा दुवा दिलप्रीत सिंग आहे, ज्याने सोमवारी गोल केला, पण एक सोपा गोलही चुकवला. तो आतापर्यंत स्पर्धेत संघर्ष करत आला आहे आणि त्याने स्वत:मध्ये सुधारणा घडविण्याची गरज आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन त्यच्या स्ट्रायकर्सच्या एकूण कामगिरीवर खूश आहेत हे वेगळे सांगायला नको.
भारताच्या मधल्या फळीत अनुभवी मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, सुमित आणि तऊण राजिंदर सिंग यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. अमित रोहिदास, जुगराज सिंग आणि संजय यांचा समावेश असलेल्या बचाव फळीनेही कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या सक्षम नेतृत्वाखाली सुधारित कामगिरी केली आहे. गोलरक्षणाच्या बाबतीत सूरज करकेरासाठी आतापर्यंत स्पर्धा चांगली गेली आहे आणि भारताचा पहिल्या पसंतीचा गोलकीपर कृष्ण बहादूर पाठकनेही दोन सामान्य सामन्यांनंतर कझाकस्तानविऊद्ध आपला खेळ उंचावला.
पण फुल्टन यांना हे देखील चांगलेच माहिती आहे की, कझाकस्तानसारख्या संघाविऊद्धच्या खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे अयोग्य ठरेल. त्याला माहिती आहे की, खरी स्पर्धा येथून सुरू होत असून मागील निकालांना काहीही महत्त्व नसते. फुल्टनना असा विश्वास वाटत आहे की, संघाचा आत्मविश्वास त्यांच्या प्रगतीला मदत करेल.









