वृत्तसंस्था / हिसोर (ताजिकिस्तान)
सीएएफए नेशन्स चषक फुटबॉल स्पर्धेत येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात विद्यमान विजेत्या इराणने भारताचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाच्या बचावफळीने चांगली कामगिरी पण इराणच्या आघाडी फळीतील खेळाडूंच्या चाली त्यांना रोखता आल्या नाहीत. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. 60 व्या मिनिटाला अमिरहुसेन हुसेनजेदाने इराणचे खाते उघडले. 89 व्या मिनिटाला अलि अलिपोरगेराने इराणचा दुसरा गोल केला. 96 व्या मिनिटाला मेहदी तारेमीने इराणचा तिसरा गोल नोंदवून भारताचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. या स्पर्धेत झालेल्या पहिल्या सामन्यात ताजिकस्तानने भारताचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला होता. आता या स्पर्धेतील भारताचा ब गटातील शेवटचा सामना 4 सप्टेंबर रोजी अफगाणबरोबर होणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक गटातील आघाडीच्या दोन संघामध्ये अंतिम सामना खेळविला जाईल. तसेच तिसऱ्या स्थानासाठीचा सामना दुसऱ्या दोन संघामध्ये होईल.









