ज्ञानेश्वरीला सुरवात करताना माउलींनी गणेश वंदना करून झाल्यावर सरस्वतीला वंदन केले. महाभारताचे महात्म्य सांगताना ते म्हणतात, महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. यापासून शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्राrयता येऊन ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली आहे. तत्वांना गोडी येऊन सुखाचे ऐश्वर्य वाढले आहे. सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्वल दिसते त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभून दिसते. जगामध्ये मोठेपणा प्राप्त व्हावा ह्यासाठी पुराणांनी आख्यानरूपाने महाभारतात प्रवेश केला. महाभारतामध्ये जे नाही ते त्रैलोक्यातही नाही असे म्हणतात. अशा ह्या महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला संवादरूपाने उपदेश केलेली गीता कमलातील परागाप्रमाणे शोभून दिसते. महाभारतामधील भीष्मपर्वात गीता सांगितली आहे. ज्याला काहीतरी चांगले काम करावे, त्यासाठी प्रयत्न करावा असे वाटते तोच गीतेचे रहस्य जाणून त्यातून योग्य ते मार्गदर्शन मिळवू शकतो.
माउली गीतेवरील श्लोकांच्यामध्ये जे तत्वज्ञान दडलेले आहे ते विशद करून सांगताना उदाहरणांची रेलचेल करतात. त्यामुळे वाचणाऱ्याच्या मनात ते तत्व खोलवर ठसते आणि आवश्यक असेल तेव्हा व्यवहारात वागताना ते आठवते. त्यामुळे अचूक व्यवहार करण्याचे कौशल्य त्याच्यात आपोआपच येते. आपल्याकडे साजूक तूप हे दुधाचे सर्वोत्तम रुपांतर मानतात. गीतेला साजूक तुपाची उपमा देताना माऊली म्हणतात, व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे महाभारतरूपी अमर्याद लोणी काढले आणि ते लोणी ज्ञानरूपी अग्नीने विचारपूर्वक कढवून गीतारूपी साजूक तूप बनवले. त्यामुळे गीतेची योग्यता तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करावा अशी आहे.
संत ग्रंथाच्या आरंभी श्रोत्यांना मोठेपणा देतात. स्वत:कडे कमीपणा घेऊन अत्यंत विनम्रतेने श्रोते तुम्ही विद्वान आहात तरीपण माझे विचार ऐकून घ्या अशी विनंती करतात. ह्यामागे त्यांचे सांगणे जे ऐकतील त्यांचे कल्याण होईल अशी भावना असते. इथेही श्रोत्यांनी त्यांची कथा मन लाऊन ऐकावी म्हणजे त्यांच्या स्वभावात त्यांचा उद्धार होण्याच्या दृष्टीने अनुकूल बदल होत जातील ह्या एकाच हेतूने श्रोत्यांची स्तुती करताना माऊली म्हणतात, लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोलले तरी त्यातून आनंद घ्यायचा, हा आईबापांचा स्वभाव असतो. त्याप्रमाणे, तुम्ही मायबाप होऊन माझा स्वीकार करा आणि माझे जे काय उणे असेल ते सहन करून घ्या. हे गीतार्थाचे काम न झेपणारे आहे. समुद्र आटवणे अशक्य आहे तरी तिच्या चोचीने टिटवी समुद्र आटवण्याचा प्रयत्न करते. त्याप्रमाणे गीतार्थ सांगण्याचा प्रयत्न, सद्गुरूंच्या आज्ञेने मी करत आहे. या गीतार्थाची महती एवढी आहे की, स्वत: शंकर महादेव आपल्या मनाशी त्याचा विचार करत असताना देवी पार्वतीने आपण एकसारखा एव्हढा विचार कशाचा करता असा प्रश्न मोठ्या आश्चर्याने त्यांना विचारला. त्यावर शंकर म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही. हे गीतातत्व पहावयास जावे त्या प्रत्येकवेळी ते नवीनच आहे असे वाटते. वेद आणि गीतेतील फरक सांगायचा झाला तर वेद हे परमेश्वराचे घोरणे आहे कारण वेद हे त्यांनी निद्रावस्थेत सांगितले आहेत.
क्रमश:








