भारताला होणार अधिक लाभ, चीनचाही फायदा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रशिया विकत असलेल्या कच्च्या इंधन तेलाचा दर आता आणखी घसरला आहे. त्यामुळे हे तेल विकत घेणाऱ्या देशांचा आणखी लाभ होत आहे. तेलाचा आंतरराष्ट्रीय दर आणि रशियाच्या तेलाचा दर यांच्यात आता 4 डॉलर्स प्रतिबॅरलच्s अंतर असल्याने रशियाचे तेल आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलापेक्षा अधिक स्वस्त झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी याच रशियन तेलाच्या खरेदीसाठी भारतावर 50 टक्के व्यापार शुल्क लागू केले आहे. तथापि, भारताकडून अमेरिका आयात करीत असलेले प्रक्रियाकृत तेलावर कोणताही कर लावण्यात आलेला नाही. कारण अमेरिका स्वत: भारताकडून काही प्रमाणात प्रक्रियाकृत इंधन तेलाची खरेदी करत आहे. भारत कच्चे तेल रशियाकडून आयात करतो. त्यावर प्रक्रिया करुन त्यापासून पेट्रोल आणि डीझेल असे पदार्थ बनवून ते अमेरिकेला किंवा युरोपियन देशांना विकतो. अमेरिकेच्या व्यापार शुल्क धोरणातली विसंगती आता बाहेर पडत आहे, असे तज्ञांचे मत आहे. अमेरिकेने भारतावर लावलेले 50 टक्के व्यापार शुल्क कसे अन्यायकारक आणि असमतोल आहे, हे यावरुन स्पष्ट होत आहे.
भारताची तेल खरेदी मोठी
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा इंधन तेल खरेदीदार देश आहे. भारताला प्रतिदिन 50 लाख बॅरल इतके कच्चे इंधन तेल लागते. यापैकी 85 टक्के तेल भारत आयात करतो. सध्या भारत रशियाकडून प्रतिदिन 20 लाख बॅरल तेल घेत आहे, जे भारताच्या प्रतिदिन आवश्यकतेच्या साधारणत: 40 टक्के आहे. आता रशियाचे तेल अधिक स्वस्त झाल्याने भारताला प्रतिदिन 80 लाख डॉलर्स किंवा वर्षाला जवळपास 300 कोटी डॉलर्सचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे भारत अमेरिकेच्या शुल्कवृद्धीनंतरही रशियाकडून तेल खरेदी करत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये भारताने रशियाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या तेलाच्या प्रमाणात वाढ केली असून आता रशिया हा भारताला सर्वात मोठा तेल पुरवठादार देश बनला आहे. चीनही रशियाकडून प्रतिदिन 50 लाख बॅरल तेलाची खरेदी करीत आहे. चीन भारतापेक्षाही रशियान तेलाचा मोठा खरेदीदार असून अमेरिकेने त्याच्यावर भारतापेक्षा कितीतरी कमी कर लागू करुन आपले कर धोरण किती विसंगत आहे, हेच स्पष्ट केले आहे, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.









