सकाळी 6 ते सायंकाळी 4 पर्यंत प्रवासी वर्ग ताटकळत
वार्ताहर/कणकुंबी
जांबोटी-कणकुंबी दरम्यान कालमणीजवळील रस्त्यावर नादुरुस्त होऊन थांबलेल्या अवजड वाहतूक ट्रकमुळे रस्ता पार करताना कचरा घेऊन जाणारा ट्रक कलंडला. त्यामुळे बेळगाव-चोर्ला-गोवा अशी वाहतूक सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 4 पर्यंत म्हणजे तब्बल दहा तास ठप्प झाली होती. त्यानंतर दोन्ही बाजूला थांबलेल्या वाहनांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी पुन्हा दीड तास कालावधी लागला. रविवारी दुपारी बेळगावहून गोव्याकडे जाणारा 16 चाकी ट्रक तांत्रिक बिघाड होऊन रस्त्यात थांबल्याने दुसऱ्या बाजूने अनेक वाहने ये-जा करत होती. वाहने ये-जा करून साईडचा रस्ता खचल्याने सोमवारी सकाळी 6 वाजता गोव्याहून बेळगावकडे कचरा घेऊन जाणारा बारा चाकी ट्रक रस्त्यालगत कलंडल्याने बेळगाव-गोवा अशी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली.सदर कचरावाहू ट्रक रस्त्यालगतच्या एका मोठ्या झाडाला टेकून राहिला. मात्र दोन्ही गाड्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक झाला.
केवळ दुचाकी वाहन ये-जा करण्याइतपत जागा शिल्लक होती. तरीदेखील सकाळी सातच्या दरम्यान काही चारचाकी वाहनधारकांनी थांबलेल्या ट्रकच्या बाजूने गटारातून मार्ग काढून वाहने काढली. परंतु त्या ठिकाणीसुद्धा एक पॅंटर अडकल्याने पुन्हा तिहेरी वाहने रस्त्यावर अडकून संपूर्ण वाहतूक बंद पडली होती. सदर घटनेची माहिती जांबोटी पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर जांबोटी ओपीचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाहुबली मरगेनकोप्प व पोलीस कॉन्स्टेबल केतन कुलकर्णी यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र दुपारी वरिष्ठ अधिकारी आपल्या फौजफाट्यासह दाखल झाले. बेळगावहून क्रेन आल्यानंतर रस्त्यावर नादुरुस्त झालेली अवजड वाहतूक ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. जांबोटी आणि कणकुंबी या दोन्ही बाजूला सुमारे दोन कि. मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विशेषत: गोवा, बदामी, रायचूर व इतर लांबपल्ल्याच्या बसगाड्यातील प्रवासीवर्गाचे अतोनात हाल झाले.
रस्त्याच्या साईडपट्ट्या नसल्याने अपघातांत वाढ
बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यापैकी चोर्ला ते रणकुंडये रस्त्याच्या दुतर्फा दगड-मातीचा भराव घालून साईडपट्ट्या भरणे आवश्यक होते. मात्र कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात रस्ता खचला आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्या संदर्भात ‘तरुण भारत’ने वेळोवेळी आवाज उठविला होता. परंतु कंत्राटदाराने व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. तसेच या मार्गावरून बेळगाव-चोर्ला-गोवा अशी मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असल्याने रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली आहे. या मार्गावरील अपघातास कणकुंबी वनखाते जबाबदार असून रस्त्याच्या विकासाला आडकाठी घालत आहे.
अनमोड घाटमार्ग अवजड वाहनांना पुन्हा दोन महिन्यांसाठी राहणार बंद
अनमोड घाटातील गोवा हद्दीत डांबरी रस्ता कोसळल्याने मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 5 जुलैपासून 2 सप्टेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवा तसेच बसेस वगळून सर्व वाहनांना प्रवेशबंदीचा आदेश दिला होता. आता पावसाच्या जोरामुळे रस्ता कोसळलेल्या ठिकाणी काम करणे मुश्किल झाले आहे. तसेच अजूनही मुख्य काम करण्यासाठी आदेश न मिळाल्याने पुन्हा आणखी दोन महिन्यांच्या कालावधीसाठी अनमोड घाट मार्ग बंद करण्यात येणार असल्याचे धारबांदोड्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. पूर्वी दिलेल्या आदेशामध्ये आणखी दोन महिन्यांचा कालावधी वाढवून देण्याची मागणी एनएच विभागातर्फे करण्यात आली असून सध्या अवजड वाहनांना घाट मार्गावरून सोडल्यास रस्ता कोसळलेल्या ठिकाणी काम करण्यास व्यत्यय येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा आणखी दोन महिन्यांसाठी अनमोड घाट मार्ग बंदचा आदेश आता जारी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.









