सायबर गुन्हेगारांनी बँकेतून टप्प्याटप्प्याने काढली रक्कम : सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल
बेळगाव : जत्रेत हरवलेल्या मोबाईलचा वापर करून सायबर गुन्हेगारांनी त्या मोबाईलधारकाच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने तब्बल 6 लाख रुपये काढल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून एखादा मोबाईल हरवल्यानंतर किंवा त्याची चोरी झाल्यानंतर पुढचे धोके काय आहेत? याचा उलगडा झाला आहे. संकेश्वर, ता. हुक्केरी येथील एका व्यापाऱ्याच्या बँक खात्यातील 6 लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी हडप केले आहेत. यासंबंधी सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला असून या विचित्र प्रकाराने तपास अधिकारीही हबकून गेले आहेत. व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून ज्या खात्यामध्ये रक्कम वळवण्यात आली होती, त्या खात्यातील रक्कम पूर्णपणे काढण्यात आली आहे.
संकेश्वर येथील एका व्यापाऱ्याची आई चिकोडी तालुक्यातील एका जत्रेसाठी गेली होती. चार दिवसांपूर्वी जत्रेत त्यांचा मोबाईल हरवला. संकेश्वरला पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला ही गोष्ट सांगितली. हरवलेल्या मोबाईलमध्ये जे सीम होते, ते त्यांच्या मुलाच्या बँक खात्याला जोडलेले होते. चार दिवसांत सात वेगवेगळ्या अकौंटमध्ये एकूण 6 लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी वळवले आहेत. बँक खात्याला लिंक असलेल्या मोबाईलमधून रक्कम वळवणे कसे शक्य झाले? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पोलीस अधिकारी बँक खात्यांची माहिती जमवत आहेत. सहजपणे आठवण ठेवता यावे, यासाठी त्यांनी सोपा पासवर्ड ठेवला होता. त्यामुळेच त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड सहजपणे सायबर गुन्हेगारांना उपलब्ध झाला. त्यांनी मोठी रक्कम काढली आहे.









