बेंगळूर : गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान यांना 2.5 कोटी रुपये कर्ज दिल्याच्या प्रकरणासंदर्भात लोकायुक्त पोलिसांनी अभिनेत्री राधिका कुमारस्वामी यांची चौकशी केली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणासंदर्भात गृहनिर्माण मंत्र्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची तपासणी केली असता त्यांना कर्ज दिलेल्यांची यादी लोकायुक्त पोलिसांच्या हाती लागली आहे. या यादीत राधिका कुमारस्वामी यांचे नाव असल्याने लोकायुक्त अधिकाऱ्यांची त्यांची चौकशी केली आहे. चौकशीवेळी राधिका यांनी आपल्याजवळ सदर रक्कम कोठून आली, याचा तपशिल सादर केला आहे. दशकापूर्वी जमीर अहमद खान यांना कर्ज दिल्याची कबुली राधिका यांनी दिली आहे. 2012 मध्ये शमिका एन्टरप्रायझेस या बॅनरखाली यश आणि रम्या यांचा अभिनय असलेल्या ‘लकी’ चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाचे लॅटेलाईट हक्क आणि चित्रपटाच्या प्रसिद्धीतून मिळालेला पैसा आर्थिक संकटात असणाऱ्या जमीर अहमद खान यांना कर्जरुपाने दिल्याचे राधिका यांनी लोकायुक्तांना सांगितले आहे.
2019 मध्ये पडले होते छापे
2019 मध्ये आय मॉनेटरी अॅडव्हायझरी कंपनीचा कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीचा घोटाळा उघडकीस आला होता. या कंपनीशी संबंधित असल्याच्या आरोपावरून अंमलबजावणी संचालनालयाने 2019 मध्ये जमीर अहमद खान यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकले होते. ईडीच्या अहवालानुसार, जमीर अहमद खान यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता संपादनाच्या आरोपावरून एसीबीने गुन्हा दाखल केला होता. नंतर एसीबी रद्द झाल्याने लोकायुक्त विभागाने चौकशी हाती घेतली होती.









