बेळगाव : राष्ट्रीय क्रीडा दिन, देशाचे महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. खेळांमुळे आपले फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक समाधान मिळण्यास मदत होते,असे विचार व्यक्त करून राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतर शालेय हॉकी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या कोणत्याही स्पर्धेमध्ये जय, पराजय महत्त्वाचा नसतो तर स्पर्धेत भाग घेणे हे महत्त्वाचे असते,असे प्रमुख पाहुणे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अभिनव जैन यांनी बोलताना म्हणाले.
टिळकवाडी येथील लेले मैदानावर या कार्यक्रमास बेळगावचे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अभिनव जैन, जिल्हा युवजन क्रीडाधिकारी बी. श्रीनिवास आणि गटशिक्षण खात्याच्या शारीरिक शिक्षण अधिकारी जे. बी. पटेल, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हॉकी बेळगाव संघटनेचे अध्यक्ष गुळाप्पा होसमणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक झाल्यानंतर प्रमुख पाहुणे अभिनव जैन यांच्या हस्ते हॉकीचे जादूगार दिवंगत मेजर ध्यानचंद आणि बेळगावचे ऑलिम्पिक हॉकी खेळाडू बंडू पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा शाल घालून व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळा हॉकी स्पर्धेला सुमारे 25 मुला-मुलींच्या हॉकी संघांनी मेजर ध्यानचंद ट्रॉफी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.









