वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या यू-23 पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक नौशाद मूसा यांनी दोहामध्ये होणाऱ्या एएफसी यू-23 आशियाई चषक पात्रता लढतीसाठी 23 जणांचा राष्ट्रीय संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेसाठी भारताचा ह गटात समावेश असून भारताचे सामने बहरिन (3 सप्टेंबर), यजमान कतार (6 सप्टें.), ब्रुनेई दारुसलाम (9 सप्टें.) यांच्याशी होणार आहेत. गटविजेता व 11 गटातील दुसरा क्रमांक मिळविणारे चार सर्वोत्तम संघ 2026 मध्ये सौदी अरेबियात होणाऱ्या एएफसी यू-23 आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. ‘आम्ही एकावेळी एका सामन्याचा विचार करणार आहोत. बहरिनविरुद्ध होणारा पहिला सामना फार महत्त्वाचा असेल, कारण आम्ही सध्या कुठे आहोत, हे त्यातून आम्हाला समजणार आहे. पहिल्या सामन्यात तीन गुण मिळविणे मोलाचे ठरणार आहे,’ असे प्रशिक्षक मूसा म्हणाले.
भारताच्या यू-23 संघाने अलीकडेच कौलालंपूरमध्ये इराकविरुद्ध दोन मित्रत्वाचे सामने खेळले. मात्र दोन्ही सामने भारताने 1-2, 1-3 अशा फरकाने गमविले. या दोन लढतीतून संघाला आत्मविश्वास मिळालाय, असे मूसा यांना वाटते. ‘इराकविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली, ही सर्वात चांगली गोष्ट आहे. इराक हा अव्वल दोन संघांपैकी एक असून आम्ही दोन्ही लढती गमविल्या असल्या तरी आपल्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले, हे उत्साहवर्धक आहे. संघाने जिगर दाखवत स्वकौशल्यावर त्यांनी विश्वासही मिळविला आहे,’ असेही ते म्हणाले. भारतीय संघ दोहाला 30 ऑगस्ट रोजीच रवाना झाला असून त्यांनी सरावही सुरू केला आहे.
एएफसी यू-23 आशियाई चषक क्वालिफायर्सचा भारतीय संघ : गोलरक्षक-साहिल, मोहम्मद अरबाझ, दिपेश चौहान. बचावपटू-बिकाश युमनाम, परमवीर, मुहम्मद सहीफ, अरीसिंते पुरक्कल, हर्ष अरुण पलांडे, शुभम भट्टाचार्य, रिकी मीतेई हाओबम. मध्यफळी-सोहम नवीन वर्श्नेया, लालरिनलिआना हनम्ते, मोहम्मद ऐमन, विबिन मोहनन, मोहम्मद सनन के, चिनगंगबम शिवाल्डो सिंग, आयुश देव छेत्री, मॅकार्टन लुईस निक्सन, लालरेम्तलुआंगा फनाइ, विनित वेंकटेश. आघाडी फळी-पार्थिव सुंदर गोगोई, मुहम्मद सुहेल, श्रीकुट्टन एमएस, साहिल हरिजन. मुख्य प्रशिक्षक-नौशाद मूसा.









