रिंडरकेनीच, स्ट्रफ, टाऊनसेंड,अॅन, रायबाकीना पराभूत
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
2025 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या शेवटच्या अमेरिकन खुल्या ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, अमेरिकेचा टेलर फ्रित्झ यांनी तर महिलांच्या विभागात अमेरिकेची जेसिका पेगुला, टॉपसिडेड आर्यना साबालेंका, बार्बोरा क्रेसिकोव्हा यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.
पुरुष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या चौथ्या फेरीतील सामन्यात स्पेनच्या अल्कारेझने फ्रान्सच्या आर्थर रिंडेरकेनीचचा 7-6 (7-3), 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. कार्लोस अल्कारेझ हा अलिकडच्या कालावधीत 13 ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणारा स्पेनचा सर्वात तरूण टेनिसपटू आहे. अल्कारेझने हा पराक्रम आपल्या वैयाच्या 22 वर्षे आणि 3 महिन्यांचा कालावधी असताना केला आहे. अल्कारेझच्या मंगळवारी उपांत्यपूर्व फेरीचा सामना 20 व्या मानांकीत जेरी लिहेकाशी होणार आहे. झेकच्या 23 वर्षीय लिहेकाने अॅड्रीयन मॅनेरिनोचा 7-6 (7-4), 6-4, 2-6, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. या सामन्यामध्ये फ्रान्सच्या मॅनेरिनोचा खेळ दर्जेदार होवूनही त्याला विजय मिळविता आला नाही.
चौथ्या फेरीतील झालेल्या अन्य एका सामन्यात सर्बियाच्या माजी टॉपसिडेड नोव्हॅक जोकोविचने जेन लिनार्ड स्ट्रफचा 6-3, 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या इतिहासामध्ये जोकोविचने आतापर्यंत 64 ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा नवा विक्रम केला आहे. जोकोविचने आतापर्यंत 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या चौथ्या मानांकीत टेलर फ्रित्झने झेक प्रजासत्ताकच्या टॉमस मॅकहेकवर 6-4, 6-3, 6-3 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. या स्पर्धेत पुरूष एकेरीमध्ये टेलर फ्रित्झ या एकमेव अमेरिकन टेनिसपटूचे आव्हान जीवंत राहिले आहे.
पेगुला, साबालेंका विजयी
महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात बेल्जियमच्या विद्यमान विजेत्या आर्यन साबालेंकाने ख्रिस्टीना बुस्काचा 6-1, 6-4 असा सहज विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. साबालेंकाचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना 2023 मधील विम्बल्डन विजेत्या मर्केटा व्होंड्रोसोव्हाशी होणार आहे. व्होंड्रोसोव्हाने इलिना रायबाकिनाचा 6-4, 5-7, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. या सामन्यात व्होंड्रोसोव्हाने 13 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. अन्य एका सामन्यात बार्बोरा क्रेसिकोव्हाने टेलर टाऊनसेंडचा 1-6, 7-6 (13-11), 6-3 असा फडशा पाडत शेवटच्या 8 खेळाडूंत स्थान मिळविले. अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने आपल्याच देशाच्या अॅनचा 6-1, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये केवळ 54 मिनिटांत फडशा पाडत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. आता पेगुला आणि क्रेसिकोव्हा यांच्यात मंगळवारी उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल.
राजेश्वरन दुसऱ्या फेरीत
अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत कनिष्ठ मुलींच्या एकेरीमध्ये भारताच्या माया राजेश्वरन रेवतीने चीनच्या वेईचा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. माया राजेश्वरनने सलामीच्या सामन्यात चीनच्या झेंग वेईचा 7-6 (7-5), 6-3 अशा सरळ सेट्समध्ये 65 मिनिटांच्या लढतीत पराभव करत विजयी सलामी दिली. हा सामना दीड तास चालला होता. माया, राजेश्वरनचा दुसऱ्या फेरीतील सामना ब्रिटनच्या हॅना क्लुगमनशी होणार आहे. कनिष्ठ मुलांच्या विभागात पहिल्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या जेरीड गेनीसने भारताच्या हितेशचा 6-2, 6-4 असा पराभव केला. त्याच प्रमाणे स्वीडनच्या हेदेने भारताच्या कृश त्यागीचा 6-2, 6-4 असा फडशा पाडला.









