देखरेखीसाठी भारत पाठविणार पथक : 4 वर्षांपासून देशात सैन्यराजवट
वृत्तसंस्था/ यंगून
युद्धग्रस्त म्यानमारमध्ये डिसेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. शेजारी देशात होणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या देखरेखीसाठी भारत स्वत:च्या पथकांना पाठविणार असल्याचा दावा म्यानमारच्या शासकीय प्रसारमाध्यमाने केला आहे. चीनच्या तियानजिन शहरात आयोजित एससीओ परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे सैन्यप्रमुख मिन आंग हाइंग यांची भेट झाली आहे.
दोन्ही देशांच्या सीमावर्ती क्षेत्रांमध्ये शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करणे, व्यापार संवर्धन आणि मैत्री तसेच सहकार्य वाढविण्याच्या उपायांवर दोन्ही नेत्यांनी बैठकीत विचारांचे आदान-प्रदान केल्याचे ग्लोबल न्यू लाइट ऑफ म्यानमार या शासकीय प्रसारमाध्यमाने सांगितले आहे. 4 वर्षांपूर्वी नोबेल पुरस्कार विजेत्या आंग सान सू की यांच्या नेतृत्वाखालील सरकारला हटवून सैन्याने सत्ता स्वत:च्या हातात घेतली होती, तेव्हापासून म्यानमारमध्ये गृहयुद्ध पेटले आहे.
म्यानमारमध्ये 28 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. सैन्य राजवट देशभरात 300 हून अधिक मतदारसंघांमध्ये निवडणूक करवू इच्छित आहे. यात मुख्य विरोधी सशस्त्र समुहाच्या कब्जातील भागही सामील आहेत. यामुळे तेथील निवडणुकीबद्दल साशंकता कायम आहे. म्यानमारमध्ये आगामी निवडणूक सर्व घटकांना सामील करत निष्पक्ष आणि समावेशक पद्धतीने होतील अशी अपेक्षा असल्याचे भारतीय विदेश मंत्रालयाने एका वक्तव्याद्वारे म्हटले आहे.
तणावादरम्यान सार्वत्रिक निवडणूक
सार्वत्रिक निवडणूक म्यानमारमध्ये सुरू असलेल्या भीषण संघर्षादरम्यान होणार आहे. या निवडणुकीचे संचालन अवघड मानले जात आहे. मागील वर्षी मतदारयादी तयार करण्यासाठी देशव्यापी जनगणना झाली होती. यादरम्यान म्यानमारच्या सैन्य राजवटीचे अधिकारी देशातील 330 जिल्ह्यांपैकी केवळ 145 जिल्ह्यांमध्येच सर्वेक्षण करू शकले होते. म्यानमारमध्ये आतापर्यंत केवळ 9 राजकीय पक्षांनी निवडणूक लढण्यासाठी नोंदणी केली आहे. तर 5 पक्षांनी प्रांतीय स्तरावर नामांकन केले असून त्यांना सैन्यराजवटीच्या अधिकाऱ्यांकडून अनुमोदन प्राप्त आहे.









