पाटण्यातील पदयात्रेत राहुल गांधींचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये इंडी आघाडीच्या वोटर अधिकार यात्रेचा समारोप पाटणा येथे एका विशाल सभेसह झाला आहे. या सभेत आघाडीच्या अनेक प्रमुख नेत्यांनी भाग घेतला. भाजपच्या नेत्यानी सावधान व्हावे, कारण हायड्रोजन बॉम्ब येत आहे, मतचोरीचे सत्य पूर्ण देश जाणून घेणार आहे, मी बिहारची जनता, युवा, महिलांचे आभार मानतो, हे राज्य क्रांतिकारी आहे, मतचोरी होऊ देणार नाही असा संदेश या यात्रेने पूर्ण देशाला दिला असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. हायड्रोजन बॉम्बनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:चा चेहरा या देशाला दाखवू शकणार नाहीत याची गॅरंटी मी जनतेला देत आहे. बिहारमध्ये एक नवा नारा ‘ वोट चोर गद्दी छोड’ दिला जात आहे. चीन आणि अमेरिकेतही लोक हा नारा देत असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
महादेवपुरा येथे वोट चोरीच्या स्वरुपात अॅटम बॉम्ब फोडल्यावर आम्ही लवकरच हायड्रोजन बॉम्ब आणणार आहोत. महात्मा गांधी यांची हत्या करणारे आता लोकशाही आणि राज्यघटनेची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आम्ही त्यांना असे करू देणार नाही. अलिकडेच आम्ही देशासमोर वोट चोरीचा पुरावा सादर केला, वोट चोरीचा अर्थ लोकांचे अधिकार, लोकशाही अणि भविष्याची चोरी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
बिहारची भूमी लोकशाहीची जननी
बिहारची भूमी लोकशाहीची जननी आहे आणि भाजप या लोकशाहीच्या जननीतूनच लोकशाही संपवू पाहत आहे. परंतु जनता लोकशाहीला संपवू देणार नाहीत. राज्यात डबल इंजिनचे सरकार असून यातील एक इंजिन गुन्ह्यांमध्ये मग्न आहे, तर दुसरे इंजिन मतदारांची नावे यादीतून वगळत असल्याचा आरोप राजद नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे.
आताच जागृत व्हावे लागेल
हे मत कुठल्याही पक्षाला नव्हे तर देशाचे मत आहे. या मताने देशाची राज्यघटना चालते, दुर्दैवाने काही लोकांनी सत्ता प्राप्त केली आणि 2014 पासून या लोकांनी देशाला ज्याप्रकारे उद्ध्वस्त केले, ते पाहता आताच आपण जागृत झालो नाही तर भविष्यात जागे होण्याची संधीच मिळणार नाही असे वक्तव्य झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केले आहे.
एकजूट होत लढावे लागेल
15 दिवस चाललेल्या या यात्रेची चर्चा पूर्ण देशात झाली. भाजपने या यात्रेत अडथळे आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु लोकांनी आम्हाला साथ दिली. भाजप मतचोरी करू पाहत असल्याने लोकांनी सतर्क रहायला हवे. आदिवासी, दलित आणि मागासांचे शतकांपासून शोषण होत आले आहे. जेव्हा-जेव्हा आम्ही एकजूट होत लढलो तेव्हा विजय मिळविला आहे. वर्तमान रालोआ सरकार ईडी, सीबीआय अणि धनशक्तीच्या जोरावर लोकप्रतिनिधींना भयभीत करण्याचे काम करत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.









