वार्ताहर/किणये
बेळगाव चोर्ला रोड, पंचवटी क्रॉस येथे दुभाजकाला कारची जोराची धडक झाली. या अपघातात कारचा समोरच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात रविवारी रात्री नऊच्या दरम्यान झाला. बेळगावहून गोव्याकडे बेळगाव चोर्ला रस्त्याने जात असलेल्या कारची दुभाजकाला जोराची धडक बसली. आणि हा अपघात घडला. या कारमध्ये चार प्रवासी होते. तसेच दोन लहान बालके होती. घटनास्थळी वडगाव ग्रामीण पोलिसांनी येऊन पाहणी केली. हुंचेनहट्टी क्रॉस येथील हा दुभाजक अपघाताचा केंद्रबिंदू बनलेला आहे. कारण यापूर्वी एका कारचा अपघात याच दुभाजकाला आदळून झाला होता. तसेच बेळगावहून गोव्याकडे जाणारा वाळूने भरलेला ट्रक या दुभाजकाला आदळला होता. यामध्ये सदर ट्रक पलटी झाला होता. वाहनचालकांना सदर दुभाजक निदर्शनास येत नाही. तसेच दुभाजकाच्या ठिकाणी अंधार आहे व या ठिकाणी सूचनाफलक देखील नाही. त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.









