वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक परिसरामध्ये शनिवारी सकाळी गौरीचे आगमन व घरोघरी उत्साही स्वागत पारंपरिक व मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले. बुधवारी 27 ऑगस्ट रोजी घरोघरी गणरायांचे मोठ्या भक्तिभावाने पारंपरिक रितीने घरोघरी प्रतिष्ठापना व उत्साही स्वागत मनोभावे करण्यात आले. गौरी ही गणपतीची बहीण असल्यामुळे गणेशचतुर्थीनंतर चौथ्या दिवशी आपला भाऊ गणपतीला ती भेटायला येते. या धार्मिक अख्यायिकेप्रमाणे गावातील कुमारिका सकाळी विहिरीवर जाऊन एका पितळी तांब्यामध्ये विहिरीचे ताजे पाणी घालून तांब्याला चुन्याच्या पांढऱ्या पट्ट्या रंगवून तांब्यामध्ये पेरुची पाने गवत, दूरड्याचे झाड घालून या कुमारिका घरोघरी पोच करतात. यावेळी गणपतीच्या उजव्या बाजुला गौरीची प्रतिष्ठापना करण्यात येते. रात्री शेपू, आंबाडा, चवळी, भोपळा पाने घेवडी पाने अशा पाच प्रकारच्या भाजीची भाजी करून तो नैवेद्य मोठ्या भक्तिभावाने गौरीला दाखविण्यात येतो व गौरीची मनोभावे पूजा करण्यात येते.









