वार्ताहर/हिंडलगा
बेळगाव येथे स्थापन करण्यात आलेल्या आंतरराज्य लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीला तीन दशके पूर्ण होऊन 31व्या वर्षात पदार्पण केल्याने हिंडलगा येथील लोकमान्य सोसायटीच्या शाखेत संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात दि. 30 रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखेचे व्यवस्थापक सचिन कावळे, तर प्रमुख अतिथी सेवानिवृत्त माध्यमिक शाळा मुख्याध्यापक जे. व्ही. नाईक, एस. जे. जाधव, एम. एम. कावळे, लोकमान्य संस्थेचे लोकमान्य वेल्थ अॅडव्हायझर प्रकाश बेळगुंदकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रथम शाखेच्या कर्मचारी राही जाधव यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश पूजन करण्यात आले. त्यानंतर ‘केक’ कापून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेला तीन दशके पूर्ण झाल्याचे औचित्य साधून 30 महिन्यासाठी नवीन ‘आनंदोत्सव निवेश ठेव’ योजनेचा शुभारंभ निवृत्त मुख्याध्यापक अमृतराव देसाई, निवृत्त केंद्र कारागृह जेलर गजानन राजगोळकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ठेव योजनेबाबत 30 महिन्यासाठी 10.50 टक्के व्याज व ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50 टक्के व्याज म्हणजेच 11 टक्के व्याजाबाबत उपस्थित ग्राहकांना माहिती देण्यात आली.
याप्रसंगी एल.डब्लू.ए. प्रकाश बेळगुंदकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी जे. व्ही. नाईक व एस. जे. जाधव यांनी डॉ. किरण ठाकुर यांच्याबरोबर कॉलेज जीवनातील आठवणी सांगून पत्रकारिता, शैक्षणिक संस्था, आर्थिक संस्था अशा विविध सेवेला वाहून घेऊन पारदर्शक व्यवहारामुळे जी प्रगती साधलेली आहे त्याला तोड नाही, असे सांगून हिंडलगा ग्राम स्तरावर ‘सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व‘ असा बहुमान द्यावा, असा सल्ला दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे व्यवस्थापक सचिन कावळे यांनी विविध योजनांची माहिती दिली. आभार तेजस्विनी देसाई यांनी मानले. सूत्रसंचालन शशीधर शिवन्नवर यांनी केले. कार्यक्रमाला एल.डब्लू.ए.सुनील अगसगेकर, रामदास कलखांबकर, अनिल हेगडे, निलेश पावशे, सरकारी आदर्श प्राथमिक मराठी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका बी. एन. बाळेकुंद्री, जी. एन. पाटील, आशा मोरे, अनिल मोरे व या भागातील ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विनायकनगर शाखेत ‘आनंदोत्सव निवेश ठेव’ योजनेचा शुभारंभ
विनायकनगर (मिलिटरी गणपती मंदिरजवळ) येथे असलेल्या लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या शाखेत संस्थेला तीस वर्षे पूर्ण झाल्याने संस्थेचा वर्धापन दिन व ‘आनंदोत्सव निवेश ठेव’ योजनेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात दि. 30 रोजी संस्थेच्या सभागृहात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखेचे व्यवस्थापक किशोर हळदणकर होते. प्रमुख अतिथी निवृत्त अधिकारी सोमनाथ जायन्नवर, नामदेव घागणे, अनंत पाटील, राजश्री मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.वर्धिनी पाटील यांनी प्रास्ताविक केले. संतोष राणे यांनी अतिथींचा परिचय करून दिला व व्यवस्थापक किशोर हळदणकर यांनी स्वागत केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गणेश पूजन करून केक कापून संस्थेचा वर्धापन दिन व आनंदोत्सव निवेश ठेव योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सोमनाथ जायन्नवर, अनंत पाटील यांनी लोकमान्य संस्थेबद्दल गौरवोद्गार काढून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आभार भाऊ कुराडे यांनी मानले सूत्रसंचालन मीनाक्षी वाळवेकर यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे ठेवीदार, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









