वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने फिडे ग्रँड स्विस आणि फिडे महिला ग्रँढ स्विससाठी एक नवीन ड्रेस कोड जाहीर केला आहे, जो आधुनिक आणि समावेशक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दाखवतो आणि खेळाची शान जपतो, असे फिडे वेबसाइटने म्हटले आहे. अधिकृत ड्रेस कोडचा भाग म्हणून योग्य जीन्सला आता परवानगी देण्यात आली आहे. हा बदल खेळाडूंना अधिक आराम आणि निवडीचे स्वातंत्र्य देईल तसेच स्पर्धेचे एकूण स्वरूप व्यावसायिक आणि आदरणीय राहील याचीही खात्री करेल.
ड्रेस कोड मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुऊष सूट, गडद बिझनेस कॅज्युअल ट्राउझर्स (निळ्या, काळ्या आणि राखाडी रंगातील नॉन-डिस्ट्रेस्ड, क्लासिक जीन्ससह), एकरंगी शर्ट (त्यात किंचित बदलांना परवानगी आहे, उदा. चेकर्ड किंवा स्ट्राइप्ड), बंद टोससह ड्रेस शूज आणि लोफर्स, एकरंगी स्निकर्स (तळवे वेगळ्या रंगाचे असू शकतात), तर महिलांना स्कर्ट सूट, पँटसूट, ड्रेस सूट, ड्रेस, गडद बिझनेस कॅज्युअल ट्राउझर्स (गडद निळ्या, काळ्या आणि राखाडी रंगातील क्लासिक, नॉन-डिस्ट्रेस्ड जीन्ससह), शर्ट/ब्लाउज, बंद टोससह ड्रेस शूज आणि लोफर्स, एकरंगी स्निकर्स (तळवे वेगळ्या रंगाचे असू शकतात) यांना मुभा देण्यात आली आहे.
‘फिडे’चे अध्यक्ष अर्काडी ड्वोरकोविच यांनी या बदलामागची भावना अधोरेखित केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, फिडेने ड्रेस कोडमध्ये अधिक लवचिकता प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत मानकांचे पालन करणे अजूनही आवश्यक आहे, परंतु मोहक, योग्य जीन्सला देखील परवानगी आहे. फिडे, बुद्धिबळ खेळाडू, आर्बिटर्स आणि अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे बुद्धिबळाची अखंडता जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि हा खेळ प्रेक्षक आणि प्रायोजकांच्या दृष्टीने आकर्षक राहील याची खात्री केली पाहिजे. या सुधारणेसह फिडे परंपरा आणि प्रगती या दोन्हींकडील आपली वचनबद्धतेची पुन्हा पुष्टी करते. असे वातावरण तयार करायचे की, जिथे खेळाडूंना आरामदायी आणि आत्मविश्वासपूर्ण वाटेल, तर खेळ जागतिक स्तरावर चमकत राहील हे यात समाविष्ट आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आगामी फिडे विश्वचषक 2025 गोव्यात 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे, ज्यामध्ये बुद्धिबळातील काही दिग्गज खेळाडू भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील या स्पर्धेत सहभागी होतील. गेल्या अनेक वर्षांपासून भारत बुद्धिबळात एक प्रमुख शक्ती राहिला आहे. गेल्या वर्षी डी. गुकेशने जागतिक अजिंक्यपद जिंकले होते, तर भारतीय संघांनी खुल्या आणि महिला दोन्ही गटांमध्ये बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये अव्वल पारितोषिक जिंकले. यावर्षी जुलैमध्ये दिव्या देशमुख महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय बनली, ज्यामुळे साऱ्या राष्ट्राचे लक्ष वेधले गेले आणि आता गोव्यात खुल्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.









