प्रतिनिधी/ पणजी
राज्यात सुरू असलेल्या गणेशोत्सव पर्वातील पाच दिवशीय गणरायांचे आज दि. 31 रोजी विसर्जन होणार आहे. दि. 27 ऑगस्टपासून गणेश चतुर्थी उत्सव सुरू असून दीड दिवशीय गणेशमूर्तींचे दि. 28 रोजी विसर्जन करण्यात आले. त्यानंतर आता पाच, सात, नऊ आणि 11 दिवशीय गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. काही ठिकाणी हा उत्सव 21 दिवसांसाठीही साजरा होत असतो. मात्र असे चित्र खास करून सार्वजनिक मंडळांच्या गणपतींच्या बाबतीतच दिसून येते. क्वचितप्रसंगी एखाद्या कुटुंबात 21 दिवशीय चतुर्थी उत्सव साजरा होतो. त्यामागे काही ठिकाणी परंपरा तर काही जणांच्या घरी नवस किंवा अन्य कारणांसाठी हा उत्सव होत असतो.
दरम्यान, राज्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळत असून त्याचा परिणाम दीड दिवशीय गणेश विसर्जनावरही झाला होता. त्या पार्श्वभूमिवर काल शनिवारी पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली होती. आजही तशीच स्थिती राहो अशी प्रार्थना गणेशभक्तांमधून करण्यात येत आहे.









