300 मंडळांना मिळाले टेम्पररी मीटर
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर, तसेच उपनगरांमध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेशोत्सव मंडळांना हेस्कॉमकडून वीजमीटर घेण्याची सूचना केली होती. 300 गणेशोत्सव मंडळांनी वीजमीटर घेतल्याची नोंद हेस्कॉमकडे आहे.
गणेशोत्सव मंडळांचा विजेचा वापर वाढल्याने मागील काही वर्षांपासून वीजमीटर घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. डिपॉझिटची रक्कम भरून मीटर दिला जात आहे. ज्या मंडळांनी एक खिडकी योजनेतून परवानगी घेतली असून त्यांना वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले. यावर्षी तब्बल एक महिना आधी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली होती. परंतु शेवटच्या चार दिवसांमध्ये मीटरसाठीचा अर्ज हेस्कॉमकडे दाखल केला. शहराच्या मध्यवर्ती भागात 93, दक्षिण भागात 112 तर उत्तर भागातील 90 मंडळांनी वीजमीटर घेतले आहे. त्यामुळे शहरातील यावर्षी 300 मंडळांनी वीजमीटर घेतले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत मीटर घेण्याची संख्या वाढल्याने हेस्कॉमकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शहर व उपनगर मिळून 380 गणेशोत्सव मंडळे आहेत. लहान मंडळे समुदाय भवन अथवा मंदिरांमध्ये गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करीत असल्यामुळे यापैकी अंदाजे 300 मंडळे वीजमीटर घेत आहेत. गणेश मंडळांचे डेकोरेशन, लायटिंग या सर्वांचा विचार करता
हेस्कॉमकडून टेम्पररी मीटर घेणे सोयीचे ठरत आहे.









