प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यामुळे शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. पण जिल्हा प्रशासनाने सुटी भरून काढण्यासाठी शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. पण शनिवार दि. 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने बेळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. यामुळे मुलांना घरी जाण्यास अडचणींचा सामना करावा लागेल. यासाठी शनिवारी सुटी किंवा नेहमीप्रमाणे सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने जिल्हाधिकारी-जिल्हा शिक्षणाधिऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. परिणामी प्रशासनाकडून सुटीचे दिवस भरून काढण्यासाठी व अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या उद्देशाने शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण शनिवार दि. 6 रोजी अनंत चतुर्दशी असल्याने बेळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. यामुळे शाळा सुटल्यानंतर घरी जाताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यासाठी शाळांना एकतर सुटी द्यावी किंवा सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यात यावी.
तसेच गणेश विसर्जन असल्याने मुलेही शाळेकडे पाठ फिरविण्याची शक्यता आहे. यामुळे 6 सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस शाळा भरविण्यासाठी शिक्षकांनाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे वर्ग चालविणेही मुश्कील होणार आहे. यासाठी अनंत चतुर्दशी झाल्यानंतर येणाऱ्या शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरवावी. जेणेकरून मुलांना अनुकूल होणार असून येण्या-जाण्यासही समस्या होणार नाहीत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी युवा समितीचे सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर, समितीचे नेते शिवाजी हवळाण्णाचे, अशोक घगवे, मोतेश बार्देशकर, सूरज जाधव, राजू पाटील, सुधीर शिरोळे, अमोल चौगुले यांच्यासह युवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.









