दांपत्याला अटक : काम करत असलेल्या घरातच केली चोरी
प्रतिनिधी/ बेळगाव
लक्ष्मीनगर, गणेशपूर येथील एका चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात कॅम्प पोलिसांना यश आले असून तब्बल 85 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी गणेशपूर येथील एका दांपत्याला अटक करण्यात आली आहे. अन्नपूर्णा जोतिबा बेळगुंदकर (वय 43), तिचा पती जोतिबा गुंडू बेळगुंदकर (वय 59) दोघेही राहणार गणेशपूर अशी त्यांची नावे आहेत. ज्यांच्या घरी चोरी झाली होती, त्याच घरात अन्नपूर्णा ही काम करीत होती. टप्प्याटप्प्याने तिने 981.01 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले होते. रमेश सुरेश रेडेकर, राहणार लक्ष्मीनगर, गणेशपूर यांच्या घरी चोरी झाली होती.
चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रमेश यांनी शनिवार दि. 2 ऑगस्ट रोजी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, उपायुक्त नारायण बरमणी, उपायुक्त एन. निरंजन राजे अरस, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे पोलीस निरीक्षक आनंद वनकुद्री, महिला पोलीस स्थानकाचे निरीक्षक दिलीप निंबाळकर आदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक पथक स्थापन करण्यात आले होते.
कॅम्पचे पोलीस उपनिरीक्षक ए. रुक्मिणी, उपनिरीक्षक जे. एस. मुल्ला, बसवराज उज्जीनकोप्प, प्रकाश सनमनी, जी. एस. लमाणी, एन. एम. तेली, एम. वाय. हडगीनाळ, एम. एम. तुप्पारोट्टी, आर. बी. मदिहळ्ळी, गीता गडदे आदींनी अन्नपूर्णा व जोतिबा या दांपत्याला अटक करून त्यांनी चोरलेल्या 981.01 ग्रॅम पैकी 877.04 ग्रॅम चे दागिने जप्त केले आहेत. त्याची किंमत सुमारे 85 लाख रुपये इतकी होते, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.









