वृत्तसंस्था / विझाग
2025 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत शुक्रवारी पहिल्याच दिवशी झालेल्या सामन्यात पुणेरी पलटण आणि तामिळ थलैवास यांनी विजयी सलामी देताना अनुक्रमे बेंगळूर बुल्स आणि तेलगु टायटन्स यांचा पराभव केला.
पुणेरी पलटण आणि बेंगळूर बुल्स यांच्यातील हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांनी 32-32 असे समान गुण नोंदविल्याने पंचांनी हा सामना पहिल्यांदाच टायब्रेकरवर निकाली केला. टायब्रेकरमध्ये पुणेरी पलटणने बेंगळूर बुल्सचा 6-4 अशा गुणांनी पराभव केला. या सामन्यात पुणेरी पलटणचा कर्णधार आदित्य शिंदेने 9 गुण तर गौरव खत्रीने 5 गुण नोंदविले. बेंगळूर बुल्सतर्फे अंकुश राठीने 5 गुण नोंदवित दर्जेदार कामगिरी केली पण ती वाया गेली.
या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पवन शेरावत आणि अर्जुन देसवाल यांच्या शानदार चढायांच्या जोरावर तामिळ थलैवासने यजमान तेलगु टायटन्सचा 38-35 अशा तीन गुणांच्या फरकाने पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात तेलगु टायटन्सच्या अर्जुन देसवालने सुपर 10 गुण नोंदविले तर पवन शेरावतने 9 गुण घेतले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत तामिळ थलैवासने तेलगु टायटन्सवर 19-14 अशी आघाडी घेतली होती.









