अंतरिम जामीन वाढविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
► वृत्तसंस्था/ जोधपूर
अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामबापूनी शनिवारी जोधपूर मध्यवर्ती कारागृहासमोर आत्मसमर्पण केले. उच्च न्यायालयाने त्यांच्या अंतरिम जामीन कालावधी वाढविण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने हे पाऊल उचलण्यात आले. 84 वर्षीय आसारामबापू यांना यावर्षी 7 जानेवारी रोजी वैद्यकीय कारणास्तव पहिल्यांदा जामीन मिळाला होता. त्यानंतर तो वेळोवेळी वाढविण्यात आला होता.
अहमदाबाद मेडिकल बोर्डाच्या अहवालाचा हवाला देत जोधपूर उच्च न्यायालयाने सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत त्यांना सतत रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. न्यायमूर्ती दिनेश मेहता आणि विनीत कुमार माथूर यांच्या खंडपीठाने 27 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत वैद्यकीय कारणास्तव वारंवार दिलासा देता येणार नाही, असे सांगितले होते.
गेल्या काही महिन्यात आसारामबापू वेगवेगळ्या शहरांमधील रुग्णालयात गेले, परंतु त्यांच्या नियमित तपासणीची प्रक्रिया कुठेही पूर्ण झाली नाही. त्यांना 21 ऑगस्ट रोजी एम्स जोधपूरमधील एम्स येथे आणण्यात आले होते. येथील डॉक्टरांनी त्यांना प्रकृती खालावल्याचा अहवाल दिला होता. परंतु न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य करत अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. 2013 मधील एका प्रकरणात आसारामबापूंना 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. 2018 मध्ये जोधपूर न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.









