चीनमध्ये लोक काहीही खाऊ शकतात, असे म्हणण्याची पद्धत आहे. इतर देशांमधील लोक जे पदार्थ खाण्याची कल्पनाही करु शकत नाहीत, किंवा तशी केवळ कल्पना केल्याने त्यांना भडभडून येईल, असे पदार्थ चीनमध्ये मिटक्या मारत खाल्ले जातात. अजगराचे मांस असो, किंवा झुरळे, पाली किंवा तत्सम सजीवांचे मांस असो, चीनमध्ये ते खाल्ले जाते. आता हेही कमी वाटेल, किंवा सुसह्या वाटेल, असा एक पदार्थ चीनमध्ये खाल्ला जातो. वास्तविक हा पदार्थ जगातील प्रत्येक देशात खाल्ला जातो. तथापि, या पदार्थाची चीनी पाककृती आपल्याला समजली, तर आपल्या मनात त्या पदार्थासंबंधीच शिसारी किंवा घृणा निर्माण होईल.
हा पदार्थ अंडे हा आहे. तो सर्वसामान्य खाद्यपदार्थ आहे. अंड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण मोठे असल्याने तो शक्तीवर्धक आणि क्षुधातृप्ती करणारा आहे. तो लोकप्रिय असल्याने त्याच्या विविध पाककृती उपलब्ध आहेत. अंड्याचे आम्लेट, भुर्जी, भजी, आमटी अशा अनेक पाककृती रचविल्या जातात. पण चीनमध्ये काही भागांमध्ये अंडी चक्क मानवी मूत्रात शिजविली जातात. लोकांनाही ती आवडतात. भारतात अशी कल्पनाही कोणी करु शकणार नाही. आपल्या अंगावर काटा उभा करणारी ही अंड्याची पाककृती चीनच्या झिनझियांग प्रांतातील डोंगयांग शहरात ही ‘डिश’ अत्यंत लोकप्रिय आहे. येथे अंडी लहान मुलांच्या मूत्रात उकडली जातात.
अशा प्रकारे अंडे शिजविल्यास ते अधिक पौष्टिक बनते, अशी या भागात समजूत आहे. मानवी मूत्रात काही प्रमाणात युरिया असतो. अंडे मूत्रात उकडल्याने तो युरियाचा अंश अंड्यात मिसळतो आणि ते अधिक चविष्ट आणि पौष्टिक होते, असे येथे मानले जाते. अशी अंडी खाणारी माणसे कधीही आजारी पडत नाहीत. तसेच त्यांना कोणत्याही विषाणूंचा संसर्ग होत नाही, अशी भावना आहे. या भावनेला वैद्यकीय शास्त्राचा कोणताही आधार नाही. पण भावनेसमोर शास्त्रही कित्येकदा फिके पडते. या पदार्थाचे स्थानिक भाषेतील नाव ‘टोंग-त्जू-दान’ असे आहे. याचा अर्थ मूत्रात शिजविलेले अंडे असाच आहे. यासाठी लागणारे मुलांचे मूत्र शाळाशाळांमधून संकलित केले जाते. ते भिन्न भिन्न रेस्टॉरंटस्मध्ये वितरीत केले जाते. नंतर ते भांड्यांमध्ये तापविले जाते आणि त्यात अंडी अनेक तास उकळली जातात. त्यानंतर ती बाहेर काढून त्यांच्यावरचे कवच वेगळे केले जाते. यानंतर ही अंडी खाण्यासाठी ग्राहकांना वाढण्यात येतात, अशी माहिती आहे.









