बिस्किटे हा खाण्याचा पदार्थ आहे. पण तो लपविण्याचाही असू शकतो, यावर आपला विश्वास बसणे कठीण आहे. तथापि, ‘ओरियो’ नामक प्रसिद्ध बिस्किटे बनविणाऱ्या ‘मोंडेजेझ इंटरनॅशनल कंपनी’ ने बिस्किटे लपविण्यासाठी नॉर्वे देशातील एका गुप्त स्थानी एक बंकर स्थापन केला आहे. कंपनीने बंकर का बनविला आणि त्यात आपली बिस्किटे का लपवून ठेवली, असा प्रश्न कोणाच्याही मनात उपस्थित होणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तर या बंकरपेक्षाही आश्चर्यकारक आहे.
2020 मध्ये अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने पृथ्वीवर अंतरिक्षातून अशनींचा मारा होईल आणि मोठी हानी होईल, असे भाकित केले होते. अशनी येऊन कोसळला तर ओरियो बिस्टिटांना कोण वाचविणार, असा प्रश्न एकाने ट्विटरवर विचारला होता. त्या प्रश्नावर कंपनीने असे स्पष्टीकरण केले होते, की पृथ्वीची हानी झाली, तर या बिस्किटांना काहीही अपाय होऊ नये, यासाठी कंपनीने एक बंकर निर्माण केला आहे. या बंकरमध्ये ही बिस्किटे सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. या बंकरला ‘डूम्स डे व्हॉल्ट’ असे संबोधले जाते. जर पृथ्वीवर प्रलय झाला, तरी ही बिस्किटे सुरक्षित रहावीत, असा कंपनीचा हेतू आहे.
या बंकरमध्ये केवळ या कंपनीची प्रत्येक प्रकारची बिस्किटे सुरक्षित ठेवण्यात आली आहेत, असे नाही. तर या बिस्किटांच्या पाककृतीही (रेसीपीज) सविस्तरपणे लिहून सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या पाककृती वाचून प्रलयानंतरच्या काळात कोणीही पुन्हा या बिस्किटांची निर्मिती जशीच्या तशी करु शकेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. 2020 पर्यंत कंपनीने या बंकरचे वृत्त गुप्त ठेवले होते. तथापि, ट्विटरवरच्या प्रश्नामुळे या कंपनीने हा रहस्यभेद आता केलेला आहे.









