प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचा पुढाकार : फिरत्या विसर्जन पुंडांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन
बेळगाव : श्री गणेश मूर्तींचे तलाव किंवा विहिरीत विसर्जन केल्याने पाण्याचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे सदर प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून फिरत्या विसर्जन पुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवार दि. 31 रोजी पाचव्या दिवशी केल्या जाणाऱ्या श्रीमूर्तीचे विसर्जन महापालिकेच्या फिरत्या विसर्जन पुंडांमध्ये करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले असून रविवारी शहरात विविध 11 ठिकाणी फिरते विसर्जन पुंड तैनात केले जाणार आहेत. रविवारी पाचव्या दिवशी घरगुती श्रीमूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे विहिरी किंवा तलावात श्रीमूर्तीचे विसर्जन करण्याऐवजी महापालिकेच्या फिरत्या विसर्जन पुंडात श्री मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. सदर वाहनांवर आरोग्य निरीक्षक व चालक कार्यरत राहणार आहेत. रविवारी दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत सदर फिरते विसर्जन पुंड कार्यरत राहणार आहेत. सदर वाहनांवर कार्यरत राहणाऱ्या आरोग्य निरीक्षक व कर्मचाऱ्यांना रविवारी दुपारी 12 वा. महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्यासमोर हजर रहावे लागणार आहे. त्यानंतर नियोजित ठिकाणी त्यांना वाहनांसह जावे लागणार असून रात्री 10 पर्यंत सेवा बजावावी लागणार आहे.










