सांगली :
चतुर्थीला गणरायाचे जल्लोषात आगमन झाल्यानंतर सांगलीकरांना आता गौरींच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे. गौरी सणासाठी बाजारपेठा सजल्या असून शहरात स्थानिकांसह कोल्हापूर, सातारा व इतर जिल्ह्यांतून आकर्षक मुखवटे दाखल झाले आहेत. यामुळे ग्राहकांना निवडीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. बाजारात गौरी मुखवटे, आरास साहित्य व पूजा साहित्य खरेदीसाठी महिला वर्गाची गर्दी होत आहे.
गौरींच्या मुखवट्यांची जोडी यंदा सातशे रुपयांपासून तब्बल सातहजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. दत्त मारुती रोड, बालाजी चौक परिसरात पूजेसाठी लागणाऱ्या मुखवटे, सजावटीचे साहित्य आणि पूजेची सामग्री खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी आहे. गौरींसाठी यंदा बाजारात तीन ते चार फुटांचे फायबर स्टँड्सही दाखल झाले आहेत. प्लास्टिक व थर्माकोलवरील बंदीमुळे यंदा पर्यावरणपूरक साहित्याला अधिक मागणी आहे. कापड, लाकूड, शाडू माती, पुठ्ठा व सेंद्रिय साहित्यांपासून बनवलेली सजावट लोकप्रिय होत आहे.
सुबक मुखवटे, कापडी मखर, कृत्रिम फुलांची आरास, लाकडी डेकोरेशन, इमिटेशन दागिने आणि सेंद्रिय रांगोळ्यांचे साहित्य ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. विशेष म्हणजे हलके, टिकाऊ व सहज बसवता येणारे कापडी मखर पुनर्वापरासाठी योग्य असल्यामुळे त्याला प्रचंड मागणी आहे. यंदा बाजारपेठेत पर्यावरणपूरकतेसह आकर्षक डिझाईन्सची रेलचेल आहे. स्थानिक व परराज्यातील हौशी कलाकार गेली अनेक महिने दिवस-रात्र मेहनत घेऊन नवनवीन कलाकृती तयार करत आहेत.
रविवार ३१ रोजी गौरी आवाहन असून, गौरी पूजन एक सप्टेंबर व २ रोजी गौरी विसर्जन आहे. सध्या बाजारात गौरी मुखवटे, आरास साहित्य व पूजा साहित्य खरेदीसाठी महिला वर्गाची गर्दी असल्याने बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.
- ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
गेल्या दोन-तीन वर्षांत ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम मिळाला आहे. यंदाही आम्ही आणखी आकर्षक डिझाईन्स तयार केल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वीपासूनच मखरनिर्मिती सुरू केली होती. तसेच विद्युत लाइट्स आणि इतर साहित्यही आगाऊ बुक करून ठेवले आहे.
-प्रकाश जाधव, विक्रेते








