मडगाव : दक्षिण गोव्यातील रिवण पंचायतीच्या हद्दीत घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत पांडवसडा-रिवण येथील दोन भावांचा शेतात टाकलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांची नावे राजेंद्र काशिनाथ गावकर (46) व मोहनदास काशिनाथ गावकर (40) अशी आहेत. दोघेही गुरांसाठी जंगलात गवत आणायला गेले होते. मृतांचे चुलतभाऊ तथा जिल्हा परिषद सदस्य सुरेश केपेकर यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
या माहितीनुसार हे दोघे भाऊ जनावरांसाठी गवत घेऊन परत येत असताना झमलेमोल-सिसोरेम परिसरात शेतकऱ्यांनी जनावरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी लावलेल्या विजेच्या तारेला चुकून स्पर्श झाला व यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. केपे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा ऊग्णालय, मडगाव येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास केपे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गावातील मेहनती व साध्या स्वभावाचे हे दोन भाऊ अचानक अशा प्रकारे दगावल्याने पांडवसडा व रिवण परिसरात शोककळा पसरली आहे. पिकांचे रक्षण करण्यासाठी विजेच्या या तारा कोणी लावल्या त्याचा सध्या पोलिस तपास चालू आहे.









