‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष : महानगरपालिकेकडून विसर्जनाची व्यवस्था
बेळगाव : गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यापासून शहर परिसरात उत्साही आणि मंगलमय वातावरण आहे. घरोघरी व सार्वजनिक स्थळांवर गणराज विराजमान झाले असून सकाळी व सायंकाळी पूजा, आरती, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष होताना दिसत आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थी (गणेश चतुर्थी) ते भाद्रपद शुक्ल चतुर्दशी (अनंत चतुर्दशी) या 11 दिवसांच्या काळात सर्वत्र गणेशमय वातावरण राहणार आहे. घरांमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना ही परंपरेनुसार त्या घराण्यांकडून होत असते. कोणाच्या घरी दीड दिवस, तर कोणाच्या घरी पाच दिवस, सात दिवस, अकरा दिवस प्रतिष्ठापना होते. बुधवारी (दि. 27) चतुर्थीला सकाळी प्रतिष्ठापना केलेल्या घराण्यांनी गुऊवारी (दि. 28) दुपारनंतर श्रीमूर्तींचे विसर्जन केले.
महापालिकेने जुना कपिलेश्वर तलाव, नवा कपिलेश्वर तलाव, जक्कीनहोंड, अनगोळ लाल तलाव, कलमेश्वर होंड जुने बेळगाव, ब्रह्मदेव मंदिर तलाव मजगाव, किल्ला तलाव, नाझर कॅम्प होंड, कणबर्गी होंड अशा नऊ ठिकाणी श्री विसर्जनाची व्यवस्था केली आहे. दीड दिवसाचा गणपती असलेल्या घराण्यांनी कुटुंबातील सदस्यांसह विसर्जन स्थळांवर उपस्थित राहून ‘मोरया’चा जयघोष करीत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. काही घराण्यांमध्ये पाचव्या तर काही घराण्यात सातव्या दिवशी श्री विसर्जन करण्याचा प्रघात आहे. येत्या रविवारी (दि. 31) पाच दिवस व सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन मंगळवारी (दि. 2 सप्टेंबर) होणार आहे. काहीजण मूळ नक्षत्रावर गणरायाचे विसर्जन करीत असतात. 2 सप्टेंबर रोजी मूळ नक्षत्र आहे. गणपतीबरोबर ज्येष्ठा गैरीचे पूजन करण्याची पद्धत अनेक घराण्यांमध्ये आहे. रविवारी (दि. 31) ज्येष्ठा गौरींचे आगमन व 1 सप्टेंबरला पूजन होईल.









