पाकिस्तानचा होणार जळफळाट : तारीख लवकरच ठरणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पुढील महिन्यात तालिबानचा एक मंत्री भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. तालिबानचे विदेशमंत्री आमिर खान मुत्ताकी हे भारताचा दौरा करू शकतात. दोन्ह देश दौऱ्याची तारीख निश्चित करण्यासाठी चर्चा करत आहेत. मुत्ताकी यांच्यावर संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे निर्बंध आहेत. यामुळे भारताला मुत्ताकी यांच्या दौऱ्याकरता सुरक्षा परिषदेकडून सूट मिळवावी लागणार आहे. दौऱ्याची तारीख निश्चित झाल्यावर भारत सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीसमोर यासंबंधी प्रस्ताव मांडणार आहे.
सर्वकाही सुरळीत राहिल्यास 2021 साली तालिबानने सत्ता सांभाळल्यापासून अफगाणिस्तानच्या कुठल्याही मंत्र्याचा भारतात हा पहिला उच्चस्तरीय दौरा असेल. भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध सुधारत आहेत. विदेश सचिव विक्रम मिसरी यांनी जानेवारी महिन्यात मुत्ताकी यांची भेट घेतली होती. विदेश मंत्री जयशंकर यांनीही मे महिन्यात त्यांच्याशी चर्चा केली होती. मुत्ताकी यांच्या दौऱ्याबद्दल होत असलेला विचार पाहता भारत तालिबानच्या राजवटीसोबत संबंध दृढ करू इच्छित असल्याचे स्पष्ट होते.
समर्थनाचा भरवसा
विदेश सचिव मिसरी यांनी जानेवारी महिन्यात दुबई येथे मुत्ताकी यांची भेट घेत अफगाणिस्तानच्या लोकांना मदत करणार असल्याचा संदेश दिला होता. भारत अफगाणिस्तानच्या विकासासाठी आवश्यक पावले उचलण्यास तयार असल्याचे मिसरी यांनी सांगितले होते. यानंतर दोन्ही देशांदरम्यान पहिल्यांदाच राजनयिक चर्चा झाली होती.
तालिबानच्या भूमिकेत बदल
विदेशमंत्री जयशंकर यांनी मे महिन्यात मुत्ताकी यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेवेळी अफगाणिस्तानने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची कठोर शब्दांत निंदा केली होती. तर अफगाणिस्तानच्या समर्थनासाठी जयशंकर यांनी मुत्ताकी यांचे आभार मानले होते. पाकिस्तानकडून भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान गैरसमज निर्माण करण्याचे होत असलेले प्रयत्न हाणून पाडल्याबद्दल मुत्ताकी यांचे जयशंकर यांनी कौतुक केले होते.









