सध्या चालू असलेल्या अमेरिकन ओपनमध्ये महिला गटात इगा स्वायटेक, कोको गॉफ, साबालेन्का आदींच्या जोडीनं एका जुन्या नावानंही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं अन् ते म्हणजे व्हिनस विल्यम्स…45 व्या वर्षी तिनं केलेलं पुनरागमन फारसं यशस्वी ठरू शकलं नाही. तिला पहिल्या फेरीतच कॅरोलिना मुचोव्हाविरुद्ध पराभूत व्हावं लागलं. असं असलं, तरी तिची जिद्द कौतुकाचा विषय ठरल्याशिवाय राहिलेली नाही…
- व्हिनस विल्यम्सची मागील दोन वर्षांत अमेरिकन ओपनमध्ये खेळण्याची ही पहिलीच खेप होती…1981 मध्ये रेनी रिचर्ड्स हे वयाच्या 47 व्या वर्षी अमेरिकन ओपनमध्ये खेळले होते. त्यानंतरची ती सर्वांत वयस्कर एकेरी खेळाडू…
- एक वर्ष आणि चार महिने टेनिस कोर्टपासून दूर राहिल्यानंतर तिनं जुलैमध्येच पुनरागमन केले. ‘मी आणि माझ्या पथकानं शक्य तितके कठोर आणि जलद परिश्रम घेतले. आम्ही अक्षरश: एकही दिवस सुट्टी घेतली नाही. मी जेवणाकडे लक्ष दिलं नाही वा मित्रांना भेटले नाही. मी तीन महिने शक्य तितका सराव करण्याशिवाय काहीही केले नाही. मी जिंकू न शकलेल्या प्रत्येक सामन्यातून शिकण्याचा आणि चांगले होण्याचा प्रयत्न केला’, असं ती नंतर म्हणाली…
- व्हिनसनं आपल्या लांबलचक कारकिर्दीत काही कमी किताबांची लयलूट केलेली नाही. तिच्या खात्यात आहेत ते एकेरीतील सात ग्रँड स्लॅम, धाकटी बहीण सेरेनासह पटकावलेले महिला दुहेरीतील 14 आणि मिश्र दुहेरीतील दोन मुकुट. याखेरीज विक्रमी पाच ऑलिंपिक टेनिस पदकांकडे कशी डोळेझाक करता येईल ?…
- 17 जून, 1980 रोजी कॅलिफोर्नियातील लिनवूड इथं जन्मलेली विल्यम्स ऑक्टोबर 1994 मध्ये 14 व्या वर्षी ऑकलंड इथं पहिली डब्ल्यूटीए स्पर्धा खेळली.
- 1997 साली रोलँ-गॅरोवरून तिनं ग्रँड स्लॅममध्ये पाऊल ठेवलं. त्यावेळी दुसऱ्या फेरीत तिला नमतं घ्यावं लागलं…त्याच वर्षीच्या शेवटी विल्यम्स पहिल्यांदाच अमेरिकन ओपनमध्ये खेळली आणि तिनं अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. तिथं मार्टिना हिंगीसकडून तिला पराभूत व्हावं लागलं…
- 1999 च्या फ्रेंच ओपनमध्ये व्हिनस नि सेरेना यांनी एकत्र येऊन त्यांचं पहिलं मोठं दुहेरीचं विजेतेपद जिंकलं. त्या वर्षी त्यांनी अमेरिकन ओपनचा किताबही खिशात घातला…
- व्हिनस विल्यम्सनं तिचा पहिला मोठा एकेरी मुकुट पटकावला तो 2000 साली, विंबल्डनमध्ये लिंडसे डेव्हेनपोर्टला नमवून. त्यावेळी ती 20 वर्षांची. त्यानंतर या कामगिरीची तिनं 2001, 2005, 2007 व 2008 मध्ये पुनरावृत्ती घडविली…
- 2000 मध्ये व्हिनसनं डेव्हनपोर्टचाच अडथळा दूर करून तिचं पहिलं अमेरिकन ओपन विजेतेपद पटकावलं अन् एका वर्षानंतर सेरेनाला हरवून दुसरं…
- फेब्रुवारी, 2002 मध्ये ती पहिल्यांदाच अव्वल क्रमांकावर पोहोचली आणि 11 आठवडे तिथं राहिली…
- 2011 च्या अमेरिकन ओपनदरम्यान विल्यम्सनं तिच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यापूर्वी माघार घेतली. तिला सांधेदुखीला आमंत्रण देणारा स्जोग्रेन्स सिंड्रोम झाल्याचं उघड झालं…2016-17 मध्ये व्हिनसनं पुनरागमन करून दोन प्रमुख स्पर्धांमध्ये (ऑस्ट्रेलियन ओपन नि विम्बल्डन) अंतिम फेरीपर्यंत आणि अमेरिकन ओपनसह इतर दोन स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली…
- मात्र अलीकडे घसरणीला तोंड द्यावं लागून विल्यम्सला सलग 10 ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत बाहेर पडावं लागलं. यात 2023 च्या अमेरिकन ओपनचाही समावेश होतो. व्हिनस खेळलेली ती सर्वांत अलीकडची स्पर्धा. आरोग्य समस्यांशी झुंजाव्या लागलेल्या या खेळाडूनं जुलै महिन्यात डीसी ओपनमधून पुनरागमन केलं…
– राजू प्रभू









