सर्वत्र गणेशाचे जल्लोषात आगमन : ढोल-ताशांच्या गजरासह फटाक्यांची आतषबाजी : पुढील दहा दिवस चैतन्यमय वातावरण
बेळगाव : बाप्पा आले, विराजमान झाले, अवघे शहर चैतन्याने सळसळले. श्री गणेशचतुर्थीच्या मंगलमय पर्वाला बुधवारी अत्यंत जल्लोषात, उत्साहात आणि तितक्याच भक्तीने प्रारंभ झाला. आता पुढील दहा दिवस हे चैतन्य असेच अखंड राहणार आहे. मंगळवार संध्याकाळपासून घरगुती गणपतीचे आणि काही सार्वजनिक मंडळांच्या श्रीमूर्तींचे आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात फटाक्यांची आतषबाजी अन् ढोल-ताशांच्या गजरात सर्वत्र बुधवारी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले. बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी गणेशभक्तांनी एकच गर्दी केली. गणरायाच्या स्वागतासाठी गणेशभक्त भारावून गेले. यंदा डीजेला प्रशासनाने बंदी घातल्याने ढोलताशे, झांजपथक अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पा विराजमान झाले. बुधवारी सकाळी तरुणाई आणि बालचमू शुचिर्भूत होऊन श्ा़dरीमूर्ती आणण्यासाठी बाहेर पडले. कोणी पालखीमधून, कोणी वाहनांमधून, कोणी उघड्या जीपवर श्रीमूर्ती ठेवून तर कोणी वाजंत्रीच्या साथीने श्रीमूर्ती आणली.
गल्लोगल्ली हेच चित्र दिसत होते. घरातील गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाल्यानंतर साग्रसंगीत, विधिवत पूजा करण्यात आली. गणराय म्हणजे विघ्नहर्ता, विद्येचे आराध्य दैवत. त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये कोणतीही उणीव राहू नये, यासाठी भक्तजनांची धडपड सुरू होती. श्रीमूर्तीच्या सभोवतीच्या सजावटीमध्ये तर वैविध्य पाहायला मिळाले. थर्मोकोल, पोकळ खांब, विद्युतमाळा, झिरमिळ्या, रंगीबेरंगी पडदे यांचा वापर करून हौशी भक्तांनी गणेशाच्या सभोवतीची आरास लक्षवेधी केली आहे. याच निमित्ताने घरोघरी मोदक आणि पुरणपोळीबरोबरच सोळा प्रकारच्या भाज्यांचा वापर करून खमंग असे खतखते तयार झाले. प्रत्येक गृहिणीच्या हाताची चव वेगळी. त्यामुळे या पदार्थांची शेजारपाजारी देवाणघेवाणही झाली. घरातील श्रीमूर्तींची पूजा करून गल्लीतील सार्वजनिक श्रीमूर्तींच्या प्रतिष्ठापनेसाठी मंडळी सज्ज झाली. रात्री उशिरापर्यंत गल्लोगल्लीतील मंडपामध्ये श्रीमूर्ती विराजमान झाली. त्याचबरोबर सजावटींचे कामही बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते.
पारंपरिक वाद्यांचा गजर
गणरायांचे स्वागत करण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. गणेशमूर्ती घेतल्यावर फुलांची उधळण करत बाप्पांच्या नामाचा जयघोष केला जात होता. गणरायाला घरी आणण्यासाठी गणेश भक्तांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिल्याचे दिसून आले. सनई चौघडे, ढोल ताशा, बँड अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. लग्नसराई नंतर अनेक महिने वादक मंडळींना काम नव्हते पण तो गणेशोत्सवामुळे त्यांना चांगले पैसे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा गगनात मावणारा नव्हता. केवळ घरगुतीच नाही तर सार्वजनिक गणेश मूर्तींच्या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांचा समावेश दिसून आला. कपिलेश्वर रोड, गणपत गल्ली, टिळकवाडी या परिसरात वादक मंडळींची लगबग होती.
सायंकाळनंतर सार्वजनिक गणेशमूर्तींचे आगमन
सकाळपासून दुपारपर्यंत घरगुती गणेशमूर्तींचे आगमन झाले. सायंकाळी सहा नंतर सार्वजनिक श्री मूर्तींचे आगमन सुरू झाले. सायंकाळी सुरू झालेल्या पावसामुळे गणेश भक्तांचा काहीसा निरस झाला परंतु अशा परिस्थितीतही गणेश भक्तांनी उत्साहात गणेश मूर्ती वेळेत मंडपापर्यंत पोहोचवल्या. परंतु बऱ्याच गणेशमूर्तींची उंची अधिक असल्यामुळे त्या मंडपापर्यंत नेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांची धडपड सुरू होती. मूर्ती आणण्यासाठी ट्रॉली, ट्रॅक्टर, ट्रक यासारख्या वाहनांचा वापर करण्यात आला. मंडळाच्या नावाचे फलक लावून टॉली सजविण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी रस्ते खराब असल्यामुळे मोठ्या गणेश मूर्ती मंडपापर्यंत नेण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. एकूणच बुधवारी दिवसभर गणरायाच्या आगमनाने संपूर्ण शहर चैतन्यमय झाल्याचे दिसून आले.
पोलीस बंदोबस्त
गणेशभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता सर्वत्र पोलीस तैनात करण्यात आले होते. शहरी भागातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरात पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा बंदोबस्त होता. वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून रस्त्यावर मोठी वाहने लावण्यास मनाई करण्यात येत होती. गणपती बाप्पांचे स्वागत करण्यात दंग असलेल्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख नियोजन केल्याचे दिसून आले.
राजा निलगारची प्रतिष्ठापना
नवसाला पावणाऱ्या संकेश्वरच्या राजा निलगारचे बुधवारी दुपारी विधिवत पूजन करुन मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक मंडळांनी स्वागत मिरवणूक पारंपरिक वाद्याच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करत काढण्यात आली. निलगारच्या दर्शनासाठी पोलीस खात्याच्यावतीने नियोजन करण्यात आले असून दिवसभर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. या पसिरात पेढे, मिठाई, ऊद, कापूर आदी स्टॉल थाटण्यात आले आहेत.









