जिल्हाधिकाऱ्यांकडून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
बेळगाव : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी भक्तीभावाने गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात भाग घेतला. स्वत:च श्रीमूर्ती नेऊन त्यांनी प्रतिष्ठापनाही केली. याचवेळी जिल्ह्यातील प्रत्येकाने बंधुभावाने व सलोख्याने रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. श्री विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित करण्याचा निर्णय जाहीर करून जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशभक्तांची कौतुकाची थाप मिळविली होती. बुधवारी गणेशचतुर्थी कार्यक्रमात त्यांनी सहकुटुंब भाग घेतला.
बंगल्यावरही प्रतिष्ठापना
राणी चन्नम्मा चौक परिसरातील गणेश मंदिरात श्री गणेशमूर्तीचे पूजन करून जिल्हाधिकाऱ्यांनी कारमधून श्रीमूर्ती आपल्या कार्यालयात नेली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे आईवडील व मुलगाही होता. कार्यालयात श्रीमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या बंगल्यावरही प्रतिष्ठापनेसाठी श्रीमूर्ती नेली.
यमकनमर्डीच्या पोलीस निरीक्षकांकडून पोलीस स्थानकात गणेशाची प्रतिष्ठापना
दसरोत्सवाच्या उद्घाटनासाठी बुकर पुरस्कार विजेत्या बानू मुश्ताक यांना सरकारने निमंत्रित केल्याच्या मुद्द्यावर वाद सुरू असतानाच बेळगाव शहर व जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवात भक्तीभावाने भाग घेऊन जातीय सलोख्याचा पायंडा रचला आहे. यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी बुधवारी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह श्रीमूर्ती आणून पोलीस स्थानकात पूजन केले. यापूर्वी बेळगाव येथील शहापूर व एपीएमसी पोलीस स्थानकात सेवा बजावतानाही त्यांनी गणेशोत्सवात भक्तीभावाने भाग घेत नागरिकांचा विश्वास संपादन केला होता. बेळगावबाहेर गेल्यानंतरही त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले. एकीकडे दु:खात असतानाच आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन स्वत:चे दु:ख विसरून त्यांनी गणेशोत्सवात भाग घेतला. स्वत:च मूर्ती आणून पोलीस स्थानकात पूजन केले. भक्तीभावाने गणेशोत्सवात भाग घेणाऱ्या मुशापुरी यांचे कौतुक होत आहे.









