तालुक्यात प्रथम साके गावात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला
By : सागर लोहार
व्हनाळी : कागल तालुक्यातील साके गाव. पूर्वी मागासलेले. पांढऱ्या पट्ट्यातील डोंगराळ भागातील गाव म्हणून परिचित होते. गावात पाणी योजना नव्हती, दळणवळणाचे प्रमुख साधन नसलेले साके पंचक्रोशीत मागास गाव म्हणून संबोधीत होते.
याच गावात 1980 मध्ये म्हणजे जवळपास 45 वर्षापूर्वी तत्कालीन त्या मंडळाचे अध्यक्ष अशोक सातुसे यांनी गावातील होतकरू तरूणांना एकत्र आणत कोल्हापुरातील सार्वजनिक न्यास, नोंदणी धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणीकृत असे पहिले समर्थ तरूण मंडळ स्थापन केले. तालुक्यात प्रथम साके गावात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला.
गणेशोत्सवासाठी मंडळातील कार्यकर्त्यांसह गावातील प्रत्येक घरातून प्रत्येकी 1 रूपये ते 5 रूपये वर्गणी जमा केली. त्यातून उत्स्फूर्त अशा लोकसहभागातून गणेशोत्सव लोक उत्सव म्हणून साजरा केला. त्यावेळी गणेश मिरवणुकीत हलगी, लेझीम पथक, ढोल–ताशा, घुणकी, कैचाळ आदी पारंपरीक वाद्यांत आणि सजवलेल्या बैलगाडीतून गणरायाची स्वागत मिरवणूक काढली जात होती.
मिरवणुकीसाठी खास बैलांना नक्षीदार झुला, शिंगांना पितळी शांम्बव्या, बैलांच्या कपाळावर काचेच्या भिंगा लावलेल्या दारक्या असे 9 बैलजोड्या, धनगरी ढोल आदींचा समावेश होता. त्यावेळी जनरेटर, इनर्व्हटर सुविधा नसल्याने विविधरंगी लाईटच्या माळा त्यासाठी भलीमोठी वायर वापरून मिरवणुकीवेळी प्रत्येकांच्या घरातून वीज कनेकशन घेत दिमाखात मिरवणूक निघायची. मिरवणुकीत नऊवारी साडीतील सुहासिनी, भगिनी आणि अबालवृद्ध आनंदाने सहभागी व्हायचे.
1980 साली गणेश चतुर्थीच्या दरम्यान कागल तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून व्हनाळी गावचे कै. मेजर आनंदराव घाटगे यांचे सुपुत्र, सध्याचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची पहिल्यांदा निवड झाली होती. त्यांचा समर्थ तरूण मंडळाने गणेश चतुर्थीनिमित्त सत्कार केला.
तसेच त्यांच्याच हस्ते गावातील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास कै.शाहिर संकपाळ (रणदेवीवाडी), तालुका पंचायत समितीचे पंचायत ऑफिसर पांढरबळे, अभियंता नातू, कागल पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक एम. व्ही. अंजिक्य देखील उपस्थित होते.
त्यानंतर 1997-98 मध्ये श्री अन्नपुर्णा सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी साके गावच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले आणि पांढऱ्या पट्ट्याचे हरित क्रांतीत रूपांतर झाले. त्यामुळे गाव सुजलाम सुफलाम झाले. त्यानंतर मंडळांची संख्या वाढली अंन् एका मंडळाच्या ठिकाणी आज सुमारे 25 मंडळे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत.
आगमन मिरवणुकीत दांडपट्टा, मर्दानी खेळ, फरिगदगा ,मागच्या– पुढच्या तिरक्या उड्या गावातील तरूण करून दाखवत होते. या मंडळाचा पहिला गणपती बाचणी (ता. कागल) येथील करागीर कै. भैरू कुंभार यांनी बनवला. ते गावात येऊन मंडळाच्या कार्यालयात चिखल माती, शाडू, गवत, पिंजार आणि नैसर्गिक रंगात गणेशमूर्ती बनवत होते.
त्यांना बिदागी (खंड) म्हणून दीड ते दोन मण भात दिले जात होते. गणेश चतुर्थीनंतर घरगुती गणपती विसर्जनावेळीच रात्री या मंडळाच्या गणपतीचे विसर्जन केले जात होते. दरम्यान, 4-5 दिवस गणपतीसमोर महिला गौराईची गाणी गात खेळत होत्या. रात्री भजन, कीर्तनासह भेदीक, पोवाडे यासह पौराणिक मराठी चित्रपट दाखवले जायचे. ते पाहण्यासाठी गावाशेजारील गावातून लोक यायचे.
या रूपातील होत्या गणेशमूर्ती
पहिल्या वर्षी श्री रामभक्त हनुमान आणि गणेशमूर्ती प्रभूरामाच्या रूपातील होती. दुसऱ्या वर्षी दगडूशेठ गणेशमूर्ती होती, त्यानंतर रोहिडेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातील स्वराज्याची शपथ घेतानाची गणेशमूर्ती बनवली होती. प्राचीन रोहिडेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारली होती.








