बेळगाव : जिल्ह्यात 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव साजरा होत असून 5 सप्टेंबर रोजी ईद मिलाद आहे. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेच्यादृष्टीsने जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मद्य विक्रीवर निर्बंध घातले आहेत. गणेशोत्सव बुधवार दि. 27 रोजी सुरू हेत असला तरी काही ठिकाणी दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस व अकरा दिवसांनी श्रीमूर्तींचे विसर्जन हेत असते. गणेश आगमन व विसर्जन काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्य विक्रीची दुकाने, बिअर बार बंद ठेवावेत, असा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी बजावला आहे.
ऐगळी, हारुगेरी, कुडची, रायबाग, गोकाक ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत 31 ऑगस्टच्या सकाळी 6 पासून 1 सप्टेंबरच्या सकाळी 6 पर्यंत, अथणी, कागवाड, मुडलगी पोलीस ठाणे हद्दीत 2 सप्टेंबरच्या सकाळी 6 पासून 3 सप्टेंबरच्या सकाळी 6 पर्यंत, बैलहोंगल, नेसरगी, कित्तूर, खानापूर, नंदगड, चिकेडी, सदलगा, अंकली, निपाणी शहर, निपाणी ग्रामीण, निपाणी बीसीपीएस, खडकलाट, गोकाक शहर, अंकलगी, घटप्रभा, संकेश्वर, हुक्केरी, यमकनमर्डी, रामदुर्ग, कटकेळ, सैंदत्ती, मुरगोड पोलीस ठाणे हद्दीत 6 सप्टेंबरच्या सकाळी 6 पासून 7 सप्टेंबरच्या सकाळी 6 पर्यंत व दोडवाड पोलीस ठाणे हद्दीत 8 सप्टेंबरच्या सकाळी 6 पासून 9 सप्टेंबरच्या सकाळी 6 पर्यंत मद्य विक्रीला निर्बंध असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा दंडाधिकारी मेहम्मद रोशन यांनी दिला आहे.









