स्पेशल रेल्वे,अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रवाशांची सोय
बेळगाव : गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे, बेंगळूर या शहरांमध्ये असलेले नागरिक गावी परत येऊ लागले आहेत. यामुळे मंगळवारी बेळगाव रेल्वेस्थानकासह मध्यवर्ती बसस्थानक व विमानतळावरही प्रवाशांची गर्दी पहावयास मिळाली. स्पेशल रेल्वे, तसेच अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रवाशांचा मार्ग मोकळा झाला होता. बेळगाव परिसरातील अनेकजण बेंगळूर, हैदराबाद, मुंबई, पुणे यासह इतर महानगरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक आहेत. गणेशोत्सवाला आवर्जून हे सर्वजण गावी परतत असतात. त्यामुळे रेल्वे, बस, खासगी बससेवा मागील चार दिवसांपासून फुल्ल आहेत. नैर्त्रुत्य रेल्वेने दोन स्पेशल रेल्वे सोडूनही त्यादेखील काहीवेळातच फुल्ल झाल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळपासून रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची गर्दी होती. त्यामुळे रेल्वेस्थानकापासून बसस्थानकापर्यंत रिक्षा, तसेच बसची वाट पाहिली जात होती. याचबरोबर मध्यवर्ती बसस्थानकातही शहरात येणाऱ्या व शहराबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली होती. बेळगाव-सावंतवाडी मार्गावरील अधिकतर बस या फुल्ल होऊन जात होत्या. त्याचबरोबर आसपासच्या गावातील नागरिक खरेदीसाठी बसने शहरात दाखल होत होते. त्यामुळे बसस्थानकात रात्री उशिरापर्यंत गर्दी असल्याचे चित्र दिसून आले.









